मुंबईतील BSE शेअर मार्केटचं नाव बदला, मनसेची मागणी
By महेश गलांडे | Published: December 23, 2020 01:17 PM2020-12-23T13:17:23+5:302020-12-23T13:19:34+5:30
9 जुलै 1875 म्हणजेच तब्बल 145 वर्षांपूर्वी मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली आहे. आशिया खंडातील सर्वात पहिलं आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाळ असणारं हे मार्केट आहे.
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नेहमीच मराठीसाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईतील शेअर मार्केटचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आशियातील सर्वात जुने असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केटचं नाव बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करण्यात यावे, असे म्हटले आहे. देशातील अर्थव्यवस्थेत आणि कॉर्पोरेट क्षेत्रात बीएसई म्हणजे मुंबई स्टॉक एक्सचेंजचं मोठं योगदान आहे.
9 जुलै 1875 म्हणजेच तब्बल 145 वर्षांपूर्वी मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली आहे. आशिया खंडातील सर्वात पहिलं आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाळ असणारं हे मार्केट आहे. देशातील कार्पोरेट क्षेत्राला वृद्धी प्राप्त करुन देण्यात आणि आर्थिक विकास साधण्याचं हे मोठं मार्केट आहे. विशेषत: BSE या नावाने हे शेअर मार्केट ओळखले जाते. मात्र, मनसेनं आता या नावाला आक्षेप घेतला असून बॉम्बेऐवजी मुंबई स्टॉक एक्सचेंज असे नामकरण करण्याची मागणी मनसेनं केली आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशिया चे सर्वात जुने स्टॉक मार्केट आहे. आपणांस विनंती आहे की हे नाव बॉम्बे बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करावे. हे स्टॉक एक्सचेंज हा महाराष्ट्र आणि भारताचा अभिमान आहे आणि याचे नाव "मुंबई स्टॉक एक्सचेंज" च असले पाहिजे.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) December 23, 2020
''बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशियाचे सर्वात जुने स्टॉक मार्केट आहे. आपणांस विनंती आहे की हे नाव बॉम्बे बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करावे. हे स्टॉक एक्सचेंज हा महाराष्ट्र आणि भारताचा अभिमान आहे आणि याचे नाव "मुंबई स्टॉक एक्सचेंज"च असले पाहिजे,'' असे ट्वीट बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबई शहराचं नावही यापूर्वी बॉम्बे असंच होतं. मात्र, मराठी जनांच्या भावना लक्षात घेऊन हे नाव बॉम्बेऐवजी मुंबई करण्यात आलं आहे.
बीएसईच्या माध्यमातून जगभरातील विविध क्षेत्रांतील कंपन्यांशी मुंबईचं नात जोडलं आहे, तसेच कोट्यवधीची आर्थिक उलाढाल या माध्यमातून होत आहे. मात्र, मनसेकडून हा भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून बॉम्बेऐवजी मुंबई नाव करण्याची मागणी मनसेनं केली आहे.