दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा; काँग्रेस नेत्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 08:09 PM2024-07-09T20:09:34+5:302024-07-09T20:10:30+5:30

राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचं नाव चैत्यभूमी करावं, अशी आग्रही मागणी डॉ. नितीन राऊत यांनी केली.

Rename Dadar Railway Station to Chaityabhoomi; Congress leader Dr. Nitin Raut's demand  | दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा; काँग्रेस नेत्याची मागणी 

दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा; काँग्रेस नेत्याची मागणी 

मुंबई : राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नावे बदलविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचं नामांतर 'चैत्यभूमी' करावे व यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सभागृहात केली.

२०१८ मध्ये राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी केलं. ओशिवारा येथे रेल्वे स्थानक बनत असतानाच त्याला राम मंदिर असं नाव दिलं. दादर स्थानकाचं नाव बदलून चैत्यभूमी करावं, ही भीमसैनिकांची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचं नाव चैत्यभूमी करावं, अशी आग्रही मागणी डॉ. नितीन राऊत यांनी  केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात दादरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादरलाच राजगृहात ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचे अंतिम विधी येथेच झाले. त्यामुळे राज्यातल्याच नाही, तर देशातल्या आणि जगातल्या भीम अनुयायांच्या भावना दादरशी जोडल्या गेल्या आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करत या अधिवेशनातच राज्य सरकारने असा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी यावेळी डॉ. नितीन राऊत यांनी राज्य शासनाला केली.

सात रेल्वे स्टेशनची नावे बदलणार, विधान परिषदेत ठराव मंजूर
मुंबईतील सात रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यासंदर्भात प्रस्ताव मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत मांडला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर ही रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यात येतील. यामध्ये मध्य रेल्वेवरील २,  पश्चिम रेल्वेवरील २ आणि हार्बर रेल्वेवरील ३ स्टेशनची नावे बदलण्यात येणार आहेत.

'या' सात स्टेशनची नावे बदलणार
करी रोडचे नाव – लालबाग
सँडहर्स्ट रोडचे नाव – डोंगरी
मरीन लाईन्सचे नाव- मुंबादेवी
चर्नी रोडचे नाव – गिरगाव
कॉटन ग्रीनचे नाव- काळाचौक
डॉकयार्डचे नाव – माझगाव
किंग सर्कलचे नाव- तीर्थनकर पार्श्वनाथ

Web Title: Rename Dadar Railway Station to Chaityabhoomi; Congress leader Dr. Nitin Raut's demand 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.