मुंबई- मुंबईतील मूळ आदिवासी कोळी जमातीने स्थापित केलेली आई मुंबादेवी मंदिरावरील हक्क प्रस्थापित करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक कोळीवाड्यातील कोळी जमात बांधवांनी श्री मुंबादेवी मातेचे सामूहिक दर्शन घेतले. मस्जिद स्टेशन जवळ असलेल्या मांडवी कोळीवाड्यातून मोठ्या बँड बाजासह पारंपारिक वेशभूषेत कोळी समाजाची मिरवणूक निघाली. यावेळी कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबादेवी मंदिरावरील हक्क कोळी समाजाला देण्याबरोबर मस्जिद स्टेशनचे नामकरण आई मुंबादेवी स्टेशन करावे अशी मागणी कोळी जमातीच्या वतीने कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी केली. यावेळी कोळी महासंघाचे युवा अध्यक्ष अँड. चेतन पाटील, कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके,देवानंद भोईर, मोहित रामले, विकास कोळी तसेच घनश्याम पाटील, विलास कोळी,चंद्रकांत कोळी,भगवान भानजी,मानिनी वरळीकर,केदार लखेपूरिया,मोहित रामले वैशाली जाधव,अजिंक्य घरत,रजनी केणी,गिरीश साळगावकर,निलेश चुनेकर, यशवंत कोळी, समीर माहुलकर, सुषमा कोळी, विनायक मेस्त्री, अपर्णा तरे,सनी वलिका,राजेंद्र गडेकर, मंदार टेमकर आदी मान्यवर उपस्थित होते
सात बेटांच्या मुंबई विकासाच्या रेटृयामध्ये मुंबादेवीचे मूळ स्थान मस्जिद स्टेशन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे स्टेशन दरम्यान होते. या देवीचे विस्थापन झालेला आज दीडशे वर्षे झाली. तेव्हापासून कोळी जमात आपला हक्क या मंदिरावरील प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्या सायन कोळीवाडा स्टेशन नाव बदलून गुरू तेगबहादूर सिंह केले ,एलफिस्टन स्टेशनचे नाव प्रभादेवी झाले, ओशिवरा स्टेशनचे नाव राम मंदिर झाले तर मसजीद स्टेशनचे नाव मुंबादेवी का नको? असा सवाल अँड. चेतन पाटील यांनी केला. मस्जिद स्टेशनचे नाव आई मुंबादेवी स्टेशन करावे अशी कोळी समाजाचे वतीने मागणी यावेळी केली.