वरळी, नायगाव येथील बीडीडी चाळींचे नामांतर; गृहनिर्माण विभागाकडून शासन निर्णय जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 06:39 AM2022-06-04T06:39:42+5:302022-06-04T06:39:55+5:30
पुनर्वसन प्रकल्पाची कामे प्रगतिपथावर
मुंबई : बीडीडी चाळींची नावे बदलण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार या चाळींच्या नामांतराचा शासन निर्णय (जीआर) शुक्रवारी गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे.
गृहनिर्माण विभागाच्या जीआरनुसार आता वरळीतील बीडीडी चाळीचे नामकरण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर करण्यात आले आहे, तर बीडीडी चाळ ना. म. जोशी मार्गासाठी आता स्वर्गीय राजीव गांधीनगर आणि बीडीडी चाळ, नायगावला शरद पवार नगर असे संबोधण्यात येईल. सध्या या चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात १९२१-२५ च्या दरम्यान मुंबई विकास विभागाने या चाळी बांधलेल्या होत्या. त्यामुळे त्या बी.डी.डी. चाळी म्हणून ओळखल्या जातात. या चाळींचा पुनर्विकास होत असल्याने या चाळींचे नामकरण करण्याची घोषणा आव्हाड यांनी विधिमंडळात केली होती. त्यानुसार हे नामकरण करण्यात आले आहे.
तत्कालीन मुंबई विकास विभागाने मुंबईतील वरळी, ना. म. जोशी मार्ग, नायगाव व शिवडी येथे एकूण २०७ चाळी बांधल्या होत्या. प्रत्येक चाळ ही तळ तीन मजल्यांची असून, त्यात प्रत्येकी ८० प्रमाणे रहिवासी गाळे आहेत. तसेच या बी.डी.डी. चाळींच्या परिसरात झोपडपट्टीसदृश बांधकामे स्टॉल्स, दुकाने, सामाजिक / शैक्षणिक संस्था देखील आहेत. या बी. डी. डी. चाळी जवळपास ९६ वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत.