Join us

राज्यातील २०६ हुतात्मा स्मारकांचे नुतनीकरण; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 1:32 AM

येत्या २० जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व २०६ हुतात्मा स्मारकांचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

मुंबई : येत्या २० जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व २०६ हुतात्मा स्मारकांचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे या स्मारकांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.हुतात्मा स्मारके दुरुस्ती आणि नुतनीकरण करण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्तीसंग्राम तसेच गोवा मुक्ती आंदोलन यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन ज्यांनी देशासाठी प्राणार्पण केले, अशा हुतात्मांच्या स्मरणार्थ राज्यात २०६ हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहे. परंतु या सर्व स्मारकांना बांधून बरीच वर्ष झाल्याने स्मारके सुस्थितीत नसल्याने दुरुस्ती तसेच नुतनीकरण करणे आवश्यक होते. या सर्व स्मारकांचे नुतनीकरण व सुशोभिकरण लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. स्मारकांवर नावे कोरण्यात आलेल्या हुतात्मांच्या कुटुंबियांचा सत्कार देखील २६ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना देशभक्तीवर आधारित चित्रपट व गीते दाखवून त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. स्मारकाचे नुतनीकरण करताना हॉलचे छप्पर, हॉलचे छत, संरक्षक भिंत, फरस बंदी, बाथरुम तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व स्वच्छतागृह व आकर्षक रंग रंगोटी करण्यात येणार आहे. यासाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असून राज्यातील सर्व स्मारकांचे नुतनीकरणाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. येत्या २० जानेवारी रोजी सर्व स्मारकांचे नुतनीकरण पूर्ण होणार आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्र