दिव्याखाली अंधार, आराखडा मंजूर नाही तरीही मुख्यालयाचे नूतनीकरण; माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 09:38 AM2023-12-15T09:38:22+5:302023-12-15T09:38:51+5:30
खुद्द पालिका मुख्यालयाचे नूतनीकरण करताना सुधारित आराखडा सादर न करताच नूतनीकरणाचे काम केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले.
मुंबई : इमारतीत फेरबदल करताना सुधारित आराखडा सादर करणे बंधनकारक असते. पालिकेचे तसे स्पष्ट नियम असताना खुद्द पालिका मुख्यालयाचे नूतनीकरण करताना सुधारित आराखडा सादर न करताच नूतनीकरणाचे काम केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले.
पालिकेने सन २०१४ ते आजपर्यंत पालिका मुख्यालयात विविध नूतनीकरण कामाअंतर्गत केलेल्या कामाची माहिती दिली. यात कोणत्याही नूतनीकरण कामांचा सुधारित आराखडा सादर केल्याचे निदर्शनास आले नाही. फक्त खासगी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारामार्फत सादर करण्यात आलेली रेखाचित्रे आरटीआय अंतर्गत अनिल गलगली यांना पालिकेने दिली आहेत.
या कामांसाठीची मंजुरी घेतली नाही :
यात स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे विस्तारित इमारतीचा तळमजला, पहिला माळा, दुसरा माळा येथे करण्यात आलेल्या सुधारित कामासाठी इमारत प्रस्ताव विशेष कक्षाकडून सुधारित आराखड्याची मंजुरी घेतली नाही.
शानदार इंटेरिअर्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे तळमजला, पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा, चौथा माळा आणि पाचवा माळा येथे करण्यात आलेल्या सुधारित कामासाठीही मंजुरी घेतली नाही, असे गलगली यांनी सांगितले.
बदल भविष्यात धोकादायक :
याठिकाणी केलेला बदल भविष्यात धोकादायक आहे. विशेष म्हणजे पालिका मुख्यालयात सुधारित काम करताना पालिका वास्तुविशारद यांच्या संमतीने आराखडा मंजूर करणे आवश्यक आहे.
याकामी खासगी वास्तुविशारद यांनी तयार केलेल्या रेखाचित्रावर काम करण्यात आले आहे. त्यामुळे आता सुधारित आराखडा पालिका वास्तुविशारद यांच्या संमतीने इमारत प्रस्ताव विशेष कक्षाकडून मंजूर करून घ्यावा, अशी मागणी गलगली यांनी केली. मुख्यालयात सुधारित आराखडा सादर करत परवानगी शिवाय केलेल्या विविध नूतनीकरण कामाबाबत संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.