लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त असतानाच बॉलिवूडमधून सतत दु:खद बातम्या येत आहेत. इरफान खान, ऋषी कपूर, वाजिद खान, गीतकार योगेश तसेच अनवर सागर यांच्यापाठोपाठ बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. प्रख्यात दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
दुपारी त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बासू चटर्जी यांनी दिग्दर्शक म्हणून रजनीगंधा, चितचोर, छोटीसी बात, खट्टामीठा, बातों-बातों में, कमला की मौत यासारखे सुंदर चित्रपट दिले. चित्रपटांत विविधता देणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटांची गती वाढविली. त्यांचे एकाच वर्षात दोन चित्रपट येणे सुरू झाले.बासूदा आपल्या चित्रपटांतून मध्यमवर्गाची छोटीसी बात सांगत. मुंबईतील बसस्टॉपपासून चाळीपर्यंत त्यांचे पिया का घर अगदी खट्टामीठा असे सिनेमे खूप गाजले.
पन्नासहून अधिक हिंदी व बंगाली चित्रपटांसह त्यांनी रजनी, व्योमकेश बक्षी या मालिकांचे दिग्दर्शन केले. हृषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यांच्या त्या काळी असलेल्या निकोप स्पर्धेमुळे खरोखर मनाला विरंगुळा देणारे चित्रपट निर्माण झाले.बासू चटर्जी यांच्यामुळे निखळ मनोरंजन करणाऱ्या शहरी मध्यमवर्गीय चित्रपटांचा प्रवाह सुरू झाला. राजेंद्र यादव यांच्या सारा आकाश कादंबरीवर बासू चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा मृणाल सेन यांच्या भुवनशोमच्या बरोबरीने समांतर धारेतला पहिला चित्रपट ठरला.बासू चटर्जी यांचे गाजलेले सिनेमेपिया का घर, रजनीगंधा, छोटीसी बात, चितचोर, खट्टामीठा, चमेली की शादी, एक रुका हुआ फैसला, मन पसंद, स्वामी.