९० रुपयांत घरी लावा महागडी चित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:05 AM2018-04-14T03:05:58+5:302018-04-14T03:05:58+5:30

एखाद्या आर्ट गॅलरीत गेल्यानंतर बरीच चित्रे आपल्याला आवडतात. आपल्या घरातही अशीच चित्रे असावीत असे आपल्याला वाटते. मात्र, त्या चित्रांची किंमत पाहली, की आपण हात आखडता घेतो.

Rent expensive clothes at 90 rupees | ९० रुपयांत घरी लावा महागडी चित्रे

९० रुपयांत घरी लावा महागडी चित्रे

Next

- अजय परचुरे 
मुंबई : एखाद्या आर्ट गॅलरीत गेल्यानंतर बरीच चित्रे आपल्याला आवडतात. आपल्या घरातही अशीच चित्रे असावीत असे आपल्याला वाटते. मात्र, त्या चित्रांची किंमत पाहली, की आपण हात आखडता घेतो. पण आता प्रख्यात चित्रकारांची चित्रे अगदी नाममात्र दरात तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लावू शकता. ज्यासाठी तुम्हांला फक्त ९० ते ११० रूपये मोजावे लागणार आहेत.
हे सगळे शक्य झाले आहे ते अगम मेहता, राहुल सिंग यादव आणि शक्ती स्वरू प साहू या तीन तरूणामुळे. ते तिघे एका अ‍ॅडव्हरटायझिंग कंपनीत वर्षभरापूर्वीपर्यंत एकत्र कार्यरत होते. चित्रांचे वेड असणाऱ्या या तिघांना ही कला तळागाळापर्यंत पोहचत नसल्याची सल होती. अनेक प्रदर्शनाला भेट दिल्यावर त्यांना कळले की, नवख्या चित्रकारांच्या चित्रांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. प्रदर्शन पाहायला येणारी माणसे चित्रकारांची तोेंडभरून स्तुती करतात, पण चित्र विकत घेताना पाठ फिरवतात. त्यामुळे सामान्य लोकांनाही ही चित्रे सहजगत्या मिळावीत या उद्देशाने या तिघांनी नोकरीवर पाणी सोडले आणि ‘फ्लोटिंग कॅनव्हास’ नावाची कंपनी सुरू केली.
ही कंपनी तुम्हांला तुमच्या आवडत्या चित्रकारांची चित्रे अगदी नाममात्र दरात एका वर्षासाठी भाड्याने उपलब्ध करून देते. एखाद्या चित्राची किंमत ५ ते ६ हजार रूपये असल्यास तुम्हांला तुमच्या घरी हे चित्र फक्त ९० रूपयांत उपलब्ध करून दिले जाते. एका वषार्नंतर परत तितकेच पैसै तुम्ही भरल्यास तुम्हांला दुसरे चित्र पुढच्या वर्षीपर्यंत भाड्याने देण्यात येते. तुम्ही एखादे चित्र वर्षभरासाठी भाड्याने आपल्या घरी लावण्यासाठी घेतले आणि काही दिवसांनी तुम्हांला ते नको असल्यास सहा महिन्यांनी तुम्ही ते बदलून घेऊ शकता. यासाठी तुम्हांला अधिकचे भाडे आकारले जाणार नाही. अ‍े-४, अ‍े-५, अ‍े-२ साईजमधील विविध चित्रांचे पर्याय कंपनीकडून दिले जातात.
सध्या या कंपनीकडे तरूण चित्रकारांचा ओढा वाढतोय. जोपर्यंत तरूण होतकरू चित्रकारांना नाव मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या चित्रांना प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे काम ‘फ्लोटिंग कॅनव्हास कंपनी’ करतेय. कंपनीकडे अशा १०० तरूण चित्रकारांची चित्रे आहेत जी मुंबईकरांना भाड्याने सध्या उपलब्ध करून दिली जात आहेत. यात या चित्रकारांना त्यांच्या चित्रांचा ७५ टक्के मोबदला देण्यात येतो. सध्या कंपनीकडे तरूण चित्रकारांसोबतच दिलीप खोमणे, साजिद-वाजिद शेख, प्रशांत चौघुले, प्रताप चाळके अशा नावाजलेल्या चित्रकारांची चित्रेही उपलब्ध आहेत.
‘तरूण चित्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा मानस आहे. त्यांच्या चित्रांचा प्रसार व्हावा आणि मध्यवर्गीय लोकांनाही अगदी अल्प दरात त्यांच्या घरी ही चित्रे लावण्यास मिळावी, ़हाच आमचा उद्देश आहे’, असे मत ‘फ्लोटिंग कॅनव्हास’ कंपनीचे संस्थापक अगम मेहता यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ही कंपनी मुंबईसह देशातील १० शहरांमध्ये ही सेवा पुरवतेय. पुढच्या काही दिवसांत ही सेवा भारतातील अनेक शहरांमध्ये पोहचवण्याचा या तीन तरूणांचा मानस आहे.

Web Title: Rent expensive clothes at 90 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.