मुंबई : कोरोना संकटामुळे मुंबईतील घरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ७० टक्क्यांनी घटले असताना घरे भाडे तत्वावर घेण्याचे प्रमाणातही लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी १ एप्रिल ते १५ आँगस्ट, २०१९ या साडे चार महिन्यांत मुंबई शहरांत १ लाख व्यवहारांची नोंद मुद्रांक शुल्क विभागाकडे झाली होती. यंदा ते प्रमाण २९ हजार ४९३ इतके कमी झाले आहे. लाँकडाऊनच्या पहिल्या तीन महिन्यांच्या तुलनेत गेल्या दीड महिन्यांत हे भाडे तत्वावरील घरांचे व्यवहार वाढलेले दिसत असले तरी ते ६० टक्क्यांपेक्षा कमीच आहेत.
कोरोना संकटाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाँकडाऊन जाहीर झाल्यानंतर जवळपास दीड महिने मुद्रांक शुक्ल विभागाचे कार्यालय बंद होते. त्यावेळी केवळ ई रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून भाडे करारांची नोंदणी होत होती. एप्रिल आणि मे महिनन्यांत अनुक्रमे २७ आणि ९०० घरांचेच व्यवहार झाले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे व्यवहार वाढले. मात्र, त्यांची संख्या अत्यल्प आहे. हे व्यवहार कमी झाल्यामुळे सरकारच्या तिजोरीत जमा होणा-या मुद्रांक शुक्लाची रक्कमही कमी झाली आहे. केवळ मजूरंच नव्हे रोजगार गमावलेल्या अनेक परप्रांतीयांनी घरवापसी केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे भाडे करार रद्द झाले आहेत. अनेक व्यावसायिकांनी आर्थिक अरिष्टांमुळे भाड्याच्या जागा सोडण्याचा सपाटा लावला आहे. तिथल्या घर मालकांना नवे भाडेकरू मिळणे अवघड जात आहे. दरवर्षी भाड्याच्या रकमेमध्ये ८ ते १० टक्के वाढ होत असते. मात्र, नवे भाडेकरू मिळत नसल्याने त्यातही वाढ होत नाही. यंदा नियमित भाडे देणेही अनेकांना शक्य होत नसल्याने घरमालकांची कोंडी सुरू आहे.
इस्टेट एजंटचा व्यवसाय चौपट : भाडे तत्वावर घर मिळवून देण्याचा व्यवसाय करणारे शेकडो इस्टेट एजंट मुंबई शहरात आहेत. घर मालकाला भाडेकरू मिळवून देणे किंवा भाडेकरूंचा घराचा शोध सुकर करण्याचे काम हे एजंट करतात. त्यापोटी त्यांना एक महिन्याचे भाडे कमिशन म्हणून मिळते. परंतु, गेल्या पाच महिन्यांत या व्यवसायाची घडी विस्कटली आहे. पहिल्या तीन महिन्यांत तर व्यवसाय जवळपास बंद होता. गेल्या दोन महिन्यांत करार होत असले तरी ते नगण्य आहेत. आँनलाईन पोर्टलच्या माध्यमातून भाड्याचे घर मिळविण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक एजंट नव्या व्यवसायाकडे मोर्चा वळवत असल्याचे शांती रिअलिटर्सच्या रचीत झुनझुनवाला यांनी सांगितले.