भाडे थकले, बिल्डर ऐकेनात...आता SRA च्या रखडलेल्या ३ योजना म्हाडा राबवणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:55 IST2025-03-28T13:54:26+5:302025-03-28T13:55:35+5:30
‘झोपु’ मार्गी लावण्यासाठी नवी शक्कल

भाडे थकले, बिल्डर ऐकेनात...आता SRA च्या रखडलेल्या ३ योजना म्हाडा राबवणार!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) २०१४ पूर्वीपासून रखडलेले पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता ‘एसआरए’ आणि शासकीय यंत्रणांकडून भागीदारी तत्त्वावर काम केले जाणार आहे. त्यानुसार ‘म्हाडा’तर्फे राबविण्यात येणाऱ्या २१ ‘झोपु’ योजनांतील १७ हजार ३२१ घरे झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी, तर १६ हजार २८६ घरे विक्रीसाठी, अशी एकूण ३३ हजार ६०७ घरे उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, ‘एआरए’मार्फत रखडलेल्या योजनांपैकी तीन योजना राबविण्यास ‘म्हाडा’ला परवानगी देण्यात आली आहे.
थकीत भाडे आणि पैशाची चणचण, यामुळे ‘एसआरए’च्या अनेक योजना रखडल्या आहेत. याप्रकरणी बिल्डरांना सूचना देऊनही ‘झोपु’ योजना पूर्ण होत नव्हत्या. परिणामी रखडलेल्या विशेषत: २०१४ पूर्वीपासून प्रलंबित योजना मार्गी लावण्याचे काम ‘एसआरए’ आणि सरकारच्या विचाराधीन होते. त्याकरिता सरकारने रखडलेल्या ‘झोपु’ योजना मार्गी लावण्यासाठी काम सुरू केले.
‘उर्वरित झोपु योजनांचे प्रस्ताव सादर करा’
‘म्हाडा’ने ‘एसआरए’कडे यासंदर्भातील पाठवलेल्या तीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय ‘म्हाडा’ने उर्वरित ‘झोपु’ योजनांचे प्रस्ताव सादर करावेत, असे ‘एसआरए’ने ‘म्हाडा’ला सुचवले आहे.
त्यानुसार, ३३ हजार ६०७ घरे मिळणार आहेत. शिवाय ‘एसआरए’मार्फत सरकारी यंत्रणांशी संयुक्त भागीदारी धोरणाअंतर्गत झोपु योजना राबविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
...या प्रस्तावांना मंजुरी
- जोगेश्वरी येथील साईबाबा
- सहकारी गृहनिर्माण संस्था
- कुर्ला नेहरूनगर येथील श्रमिकनगर गृहनिर्माण संस्था
- चेंबूर येथील जागृती संस्था
२२८ एकूण रखडलेल्या झोपु योजना
‘एसआरए’, सरकारी यंत्रणांसह भागीदारी तत्त्वावर शासकीय, निमशासकीय महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत या योजना मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यात ‘झोपु’च्या रखडलेल्या २२८ योजना असून, यातील २१ योजना ‘म्हाडा’च्या जमिनीवर आहेत. त्या ‘म्हाडा’ने राबवाव्यात, असे ‘एसआरए’ने सुचविले होते.