धनंजय मुंडे खंडणी वसुलीप्रकरणी रेणू शर्मा जामिनासाठी न्यायालयात; अर्जावर मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 06:40 AM2022-06-01T06:40:54+5:302022-06-01T06:40:59+5:30
अर्जावर मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे निर्देश
मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक केलेल्या रेणू शर्माने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने तिच्या जामीन अर्जावर मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
या आधी महानगर दंडाधिकारी सुधीर भाजीपाले यांनी रेणू शर्माचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ‘आरोपीवर करण्यात आलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. तपास सुरू आहे आणि तपासाच्या या टप्प्यावर आरोपीची जामिनावर सुटका केली, तर तपासाला नुकसान पोहोचेल,’ असे निरीक्षण नोंदवित दंडाधिकारी न्यायालयाने शर्मा हिचा जामीन अर्ज फेटाळला.
शर्माने जामीन अर्जात म्हटले आहे की, ती एका चांगल्या घरातील स्त्री आहे आणि तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. लिव्ह-इन-रिलेशनशिपचे प्रकरण दाबण्यासाठी मुंडेंनी आपल्याविरोधात तक्रार केली आहे. तक्रार करण्यासाठी मुंडे यांनी असामान्य विलंब केला आहे आणि त्याचे कारणही त्यांनी दिलेले नाही. मी मुंडेंविरोधात जानेवारी, २०२१ मध्ये तक्रार केल्याने, त्यांनी मुद्दाम माझ्याविरोधात तक्रार केली आहे. मी त्यांच्याकडून एक प्रकारची खंडणी मागत असल्यासंदर्भात कोणतेही फोन रेकॉर्डिंग नाही. तपास यंत्रणेने मला इंदूरवरून अटक करण्यापूर्वी समन्स बजवायला हवे होते, असे शर्माने जामीन अर्जात म्हटले आहे. तिच्या जामीन अर्जावर ८ जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण ?
धनंजय मुंडे यांच्याकडून पाच कोटी रुपये, एक गाळा आणि महागडा फोन वसूल केल्याप्रकरणी शर्मा हिला एप्रिलमध्ये अटक करण्यात आली. रेणू मुंडेकडून मोठ्या रकमेची मागणी करत होती आणि रक्कम न दिल्यास त्यांची समाजातील प्रतिमा खराब करण्याची धमकीही मुंडेना दिल्याचा आरोप शर्मावर आहे. शर्मा सतत मागणी करत असल्याने फेब्रुवारी व मार्च २०२२ दरम्यान मुंडे यांनी तिला ३ लाख रुपये व दीड लाख रुपयांचा फोन पाठविला. त्यानंतरही शर्माची मागण्या वाढत राहिल्या, असे मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.