Join us

रेणू शर्मा रिलेशनशिपसाठी गळ घालत होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:06 AM

भाजप नेते कृष्णा हेगडे यांचा आरोप : अंबोली पोलिसांत दिली लेखी तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे सामाजिक ...

भाजप नेते कृष्णा हेगडे यांचा आरोप : अंबोली पोलिसांत दिली लेखी तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी गुरुवारी केला. याप्रकरणी त्यांनी अंबोली पोलिसांना एक पत्र दिले असून, पाेलीस त्यातील सत्य पडताळून पाहत आहेत.

हेगडे यांनी शर्मावर आमिषाने भुलवणे, हनी ट्रॅप, ब्लॅकमेल आणि खंडणी वसुलीसारखे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावे एक पत्र दिले आहे. या पत्रात ‘२०१० पासून रेणू शर्मा सतत कॉल आणि मेसेज करून रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या. मी नकार देऊनही शर्मा यांनी २०१५ पर्यंत मला त्रास देणे सुरूच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. त्या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले तसेच त्यांची बाहेरून चौकशी केली. ज्यात शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींनाही फसवल्याची माहिती मला मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी’, असे हेगडे यांनी नमूद केले आहे. शर्मा ज्या क्रमांकावरून हेगडे यांना संपर्क करायच्या ते मोबाइल क्रमांकही त्यांनी पोलिसांना दिले.

* ...त्याजागी मी असू शकलो असतो !

शर्मा यांनी ६ आणि ७ जानेवारी २०२१ रोजी मला व्हॉट्सॲपवरून मेसेज केला. ज्याला मी थंबचा इमोजी पाठविला. त्यांना भेटण्याची इच्छा नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्याशी संबंध ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी मुंडे यांच्यावरील आरोप ऐकून मला धक्का बसला आणि शर्मांबाबत पोलिसांना कळविण्याचा निर्णय घेतल्याचे हेगडेंनी पत्रात म्हटले आहे. आज मुंडे आहेत काही वर्षांपूर्वी त्याजागी मी असू शकलो असतो तर उद्या दुसरे कोणी, त्यामुळे पोलिसांनी शर्मांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमेश्वर कामथे यांना फोन आणि मेसेजमार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.

* विमान कंपनीच्या अधिकाऱ्यावरही शर्मांचा आरोप

नामांकित विमान कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या रिझवान शेख यांच्यावरही शर्मा यांनी शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. त्यांच्याविरोधातही बोली पोलिसांत १५ एप्रिल, २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...........................