मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती कायदा लोकसभा, राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर या कायद्याच्याविरुद्ध देशभर आंदोलन करण्यात येत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला लोकं रस्त्यावर उतरुन विरोध दर्शवत आहेत. आंदोलन करत असताना अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना देखील घडत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन देशात शांतता राखण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदी यांच्या या ट्विटला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी रिट्विट करत तुम्हाला देशात शांतता हवी असेल तर आधी भाजपाच्या आयटी सेलच्या ट्विटर हॅण्डलपासून सामान्य लोकांना लांब राहण्यास सांगा असं म्हणत रेणुका शहाणे यांनी मोदींना टोला लगावला आहे.
रेणुका शहाणे ट्विट करत म्हणाल्या की, सर आधी सामान्य जनतेला तुमच्या आयटी सेलच्या ट्विटर हँडलपासून दूर राहण्याची विनंती करा. कारण त्यांच्याकडूनचं अधिकाधिक अफवा, खोटी माहिती पसरवण्यात येत असल्याने देशाच्या बंधुत्वाला, शांततेला आणि एकतेला धोका निर्माण होत आहे. तुमची आयटी सेल खरी तुकडे तुकडे गँग आहे. भाजपाच्या आयटी सेलला द्वेष पसरवण्यापासून थांबवा असं ट्विट करत रेणुका शहाणे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे
नरेंद्र मोदींनी ट्विट करुन नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन हिंसक आंदोलन करणे हे दुर्दैवी आणि अत्यंत त्रासदायक आहे. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे आपल्या लोकशाहीचा भाग आहे. पण कधीही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन सर्वसामान्यांच्या जीवनात अडथळा निर्माण करणे हे आपल्या तत्वात बसत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. तसेच आपण सर्वांनी एकत्रितपणे भारताच्या विकासासाठी आणि प्रत्येक भारतीय, विशेषतः गरीब, वंचित आणि शोषितांच्या सक्षमीकरणासाठी काम करणं ही काळाची गरज आहे. आम्ही स्वार्थासाठी स्वारस्य असलेल्या गटांना आमचे विभाजन करण्यास आणि त्रास निर्माण करण्यास थारा देऊ शकत नाही. शांतता, ऐक्य आणि बंधुता टिकवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवा व इतर खोटेपणापासून दूर रहावे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले होते.
संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना देशाच्या राजधानीतही या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर आता लखनऊ, मुंबईसह देशभरातील विविध भागात आंदोलन सुरु आहे.