मराठी 'नॅाट वेलकम' म्हणणार्‍यांना रेणुका शहाणेंचे सडेतोड उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 07:02 PM2024-05-07T19:02:54+5:302024-05-07T19:03:41+5:30

भरत जाधव, मंगेश देसाई, प्रा. वामन केंद्रे यांनीही व्यक्त केली नाराजी

renuka shahane reply to those who say Marathi 'Nat Welcome'! | मराठी 'नॅाट वेलकम' म्हणणार्‍यांना रेणुका शहाणेंचे सडेतोड उत्तर!

मराठी 'नॅाट वेलकम' म्हणणार्‍यांना रेणुका शहाणेंचे सडेतोड उत्तर!

मुंबई - ऐन निवडणूकीच्या काळात एक जाहिरात आली आणि मराठीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर अभिनेता भरत जाधव, मंगेश देसाई यांच्यासह पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांनीही 'लोकमत'शी बोलताना याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सूरतच्या आयटीकोड इन्फोटेक कंपनीने गिरगावमधील कार्यालयासाठी ग्राफिक डिझायनर पदाकरीता दिलेल्या जाहिरातीत 'इथे मराठी उमेदवारांचे स्वागत नाही', असे नमूद केल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून, मराठीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठीद्वेष्ट्या लोकांविरोधातील या लढाईत आता राजकारण्यांसोबत कलावंतही उतरले आहेत. 

मराठी माणसाला घर नाकारणे, दुकानावर मराठी पाट्या न लावणे, मराठी न बोलणे असे प्रकार सर्रासपणे सुरू असताना आता मराठी उमेदवारांना चक्क नोकरी नाकारण्यात आल्याने अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'मुंबईत राहून मराठी माणसांचा द्वेष करणाऱ्यांना धडा शिकवा' असे आवाहन केले. 

मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनीही कारवाईची मागणी केली आहे. आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सोशल मीडियाद्वारे मराठीद्वेष्ट्या लोकांविरोधातील आपला राग व्यक्त करत अशा लोकांना मत न देण्याचे आवाहन केले आहे.

रेणुकाने ट्विट केलेय की, मराठी 'नॅाट वेलकम' म्हणणार्‍यांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरे न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखले जाते, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे असेही रेणुकाने लिहिले आहे. रेणुकाची हि पोस्ट शेकडो लोकांनी रिपोस्ट केली असून, नेटकरी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

भरत जाधव म्हणाला की, खरं तर अशा लोकांकडे लक्ष द्यायला नको. ज्यांच्या कोणाच्या मनात अशा प्रकारचा विचार आला त्याच्या बुद्धिमत्तेची कीव येते. आज जग कुठे चालले आहे आणि तुम्ही कुठे निघलात याचा विचार करा. अशा लोकांना थारा मिळणे कठीण आहेच, पण असा विचार अमलात आणणेही सोपे नसल्याचे मतही भरतने व्यक्त केले.

घडलेल्या प्रकाराचा निषेध करत मंगेश देसाई म्हणाला की, कुठेही भाषा-प्रांतवाद आड येता कामा नये. पुढे याचं पर्यवसन खूप वाईट होईल. महाराष्ट्रात-मराठी वस्तीती राहून मराठी लोकांना नोकरीसाठी अर्ज भरू नये असं म्हणणं म्हणजे आपल्याच घरात येऊन तू पिऊ नको असं सांगण्यासारखं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जगभरात भारताचा उदोउदो होत असताना सूरतमधल्या एखाद्या कंपनीची अशी विचारधारा असणं खूपच चुकीचं आहे.

वामन केंद्रे म्हणाले की, राजकारण बाजूला ठेवून बोलायचं तर भूमीपुत्रांना किंवा एखाद्या राज्यातील लोकांना त्यांच्याच राज्यात जर प्राधान्य मिळालं नाही तर ते कुठे मिळणार? महाराष्ट्रात मराठी भाषिकांना कोणी नोकरीसाठी मज्जाव करत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. गुणवत्तेच्या आधारावर निवड करणं किंवा न करणं हे मान्य आहे, पण ज्या राज्यात व्यवसाय करता त्याच राज्यातील मराठी भाषिकांना सामावून न घेणं अजिबात योग्य नाही.
 

Web Title: renuka shahane reply to those who say Marathi 'Nat Welcome'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.