सीएसएमटी घुमटाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 01:01 AM2020-02-09T01:01:19+5:302020-02-09T01:01:22+5:30
इमारतीला तडे; काम संथ गतीने । पावसात सीएसएमटी हेरिटेज वास्तूचे तळे होण्याची भीती
कुलदीप घायवट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक वारसा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या हेरिटेज इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या मुख्य घुमटाच्या सांध्याला, घुमटावरील अन्य ठिकाणी तसेच वास्तूतील विविध पुतळ्यांना तडे गेले आहेत. ते भरण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. काम पावसाआधी पूर्ण न झाल्यास या हेरिटेज वास्तूचे तळे होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सीएसएमटीची इमारत मे १८८८ साली उभारण्यात आली. जगातील ‘पहिल्या दहा’ ठरलेल्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची नोंद आहे. मात्र जागतिक वारसा असलेल्या इमारतीच्या घुमटाला जागोजागी तडे गेले आहेत.
गेल्या वर्षी पावसात इमारतीच्या घुमटाच्या ठिकाणी गळती सुरू झाली होती. त्यामुळे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून प्रत्येक भागाची पाहणी करण्यात येत आहे. इमारत दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. या इमारतीचे काम हाती घेण्यात आले असले तरी कामाला म्हणावी तशी गती नाही. त्यामुळे पावसापूर्वी काम पूर्ण न झाल्यास हेरिटेज वास्तूचे तळे होईल, अशी भीती वास्तू वारसातज्ज्ञ चेतन रायकर यांनी व्यक्त केली.
कंत्राटदारांचे थकले २ कोटी रुपये
एका बँकेकडून हेरिटेज इमारतीच्या कामासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी दिला जात आहे. मात्र या कामासाठी नेमलेल्या दोन कंत्राटदारांचे पैसे अनेक दिवसांपासून थकल्याने त्यांनी काम बंद केले आहे. तब्बल २ कोटी रुपये रेल्वे प्रशासन आणि बँकेकडून थकले आहेत, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका कंत्राटदाराने दिली.
च्सीएसएमटीची हेरिटेज इमारत पूर्णपणे मजबूत आहे. इमारतीची वेळेवर दुरुस्ती केली जाते. कंत्राटदारांचे २ कोटी रुपये थकल्याचे प्रकरण अंतर्गत विषय आहे.
च्हा विषय आम्ही सोडवत आहोत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.