Join us

मुंबईत मोठ्या गळतीची दुरुस्ती; वरळी आणि दादरसह अनेक भागात परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 6:52 PM

मुंबई - गळतीचे प्रमाण वाढल्याने मुंबईत अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पवई येथे वैतरणा आणि उर्ध्व वैतरणा यामधील ९०० मि.मी. ...

मुंबईगळतीचे प्रमाण वाढल्याने मुंबईत अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पवई येथे वैतरणा आणि उर्ध्व वैतरणा यामधील ९०० मि.मी. व्यासाच्या छेद  जल जोडणीवर अकस्मात गळती उद्भवल्याने वरळी, प्रभादेवी, दादर, धारावी, ग्रॅण्ट रोड, कुलाबा, फोर्ट या विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. शनिवार सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. 

पवई येथे वैतरणा (२४०० मि.मी.) आणि उर्ध्व वैतरणा (२७५० मि.मी.) यामधील ९००  मि.मी. व्यासाच्या छेद जलजोडणीवर अकस्मात गळती उद्भवली. पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे मलबार हिल, वरळी आणि पाली येथील जलाशयाद्वारे व माहिम येथून होणा-या थेट पाणीपुरवठ्यावर शनिवार दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ या दरम्यान परिणाम होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आला आहे. 

 

या भागांत पाणीपुरवठ्यावर परिणाम... 

* जी दक्षिण विभागः वरळी कोळीवाडा, पोचखानवाला मार्ग, वरळी बीडीडी चाळ, प्रभादेवी, डिलाईल मार्ग, आदर्श नगर, जनता कॉलनी, वरळी हिल मार्ग

* जी उत्तर विभागः माहिम (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी

* डी विभागः लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपिअन्सी रोड), भुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, रीज मार्ग, महालक्ष्मी मंदीर विभाग, एल. डी. रुपारेल मार्ग

* ए विभागः कुलाबा, न्यू फोर्ट, बॅक बे, मिलेट्री ऍन्ड नेव्ही विभाग, साबू सिद्दीकी

टॅग्स :मुंबई