मुंबई : शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक कचरा पेट्या आहेत. मात्र, या कचरा पेट्यांचीच इतकी दुरवस्था झाली आहे की, नागरिकांकडून टाकला जाणारा कचरा हा कचरा पेटीत न जाता अस्ताव्यस्त परिसरात विखुरला जातो. त्यामुळे परिसर अस्वच्छ, बकाल होत दुर्गंधी, रोगराई पसरण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे मुंबईच्या विविध भागांतील सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा पेट्या दुरुस्त करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.
यामध्ये प्रत्येक विभागातील मागणी व कचरा पेट्या दुरुस्त करण्यात येणार आहेत. मुंबईतील सार्वजनिक रस्ते, चौकांत पालिकेकडून कचरा टाकण्यासाठी कचरा पेट्या ठेवण्यात येतात. अनेक ठिकाणी त्यांचे तुटलेले पत्रे, फुटलेल्या कचरा पेट्या अशी परिस्थिती दिसून येते. त्यामुळे नागरिकही पेटीत कचरा टाकण्याऐवजी कचरा अस्ताव्यस्त पद्धतीने टाकतात.
पालकमंत्र्यांकडून कचरा पेट्या:
मुंबईत सुरू असणाऱ्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सहाय्यता कक्षाकडून कचरा पेट्यांचे वाटप गृहनिर्माण सोसायट्यांना करण्यात येणार आहे. पश्चिम उपनगरातील ज्या गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा पेट्यांची आवश्यकता आहे, अशांनी आपली मागणी नोंदवून कचरा पेट्या उपलब्ध करून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
रुग्णालयाजवळ भूमिगत कचरा पेट्या:
पालिका प्रशासनाने भूमिगत कचरा पेट्यांचा पर्याय आणला होता; पण जागा मिळत नसल्यामुळे हा प्रयोग अयशस्वीच ठरला होता. मुंबईत २० ठिकाणी भूमिगत कचरा पेट्या बसवण्याचे पालिकेने ठरवले होते व त्याकरिता जागाही शोधण्यात येत होत्या.
सव्वाचार कोटी रुपये खर्च करून कचरा पेट्या बसवण्यात येणार होत्या. मात्र, त्यापैकी मोजक्या सहा-सात ठिकाणीच या पेट्या बसवण्यात आल्या होत्या. त्यातही त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरल्याने नागरिक हैराण झाले.
मुंबईत जमिनी खाली उपयोगिता वाहिन्यांचे जाळे पसरलेले असल्यामुळे या दोन घनमीटरच्या कचरा पेट्यांसाठी जागा मिळणे मुश्कील झाले होते. भूमिगत कचरा पेट्यांची उपयोगिता पालिकेने करण्याचे ठरवले आहे.