मलबार हिल जलाशयाची आता डागडुजी; पुनर्बांधणीची निविदा पालिका करणार रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 10:21 AM2024-06-08T10:21:53+5:302024-06-08T10:26:54+5:30

दक्षिण मुंबईतील १३६ वर्षे जुना व हेरिटेज दर्जाचा मलबार हिल जलाशय डागडुजी करून सुस्थितीत येऊ शकतो, असा अहवाल तज्ज्ञ समितीने दिला आहे.

repair of malabar hill reservoir now the municipality will cancel the tender for reconstruction in mumbai  | मलबार हिल जलाशयाची आता डागडुजी; पुनर्बांधणीची निविदा पालिका करणार रद्द 

मलबार हिल जलाशयाची आता डागडुजी; पुनर्बांधणीची निविदा पालिका करणार रद्द 

मुंबई : दक्षिण मुंबईतील १३६ वर्षे जुना व हेरिटेज दर्जाचा मलबार हिल जलाशय डागडुजी करून सुस्थितीत येऊ शकतो, असा अहवाल तज्ज्ञ समितीने दिला आहे. त्यामुळे तो नव्याने बांधण्याची निविदा मुंबई महापालिका रद्द करणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे आता मलबार हिलच्या सुप्रसिद्ध हँगिंग गार्डनलाही धक्का बसणार नाही.

मलबार हिल जलाशय जुना असून, त्याच्या डागडुजीची गरज निर्माण झाली आहे. हा जलाशय नव्याने बांधायचा झाल्यास अनेक झाडांचा बळी जाणार होता. तेथील मोकळ्या जागेलाही फटका बसणार होता. 

१) जलाशयाची पुनर्बांधणी व त्यासाठी येणाऱ्या ७०० कोटींच्या खर्चावरही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.  या पार्श्वभूमीवर नव्याने बांधकामाच्या निविदा रद्द करण्याबाबत शुक्रवारी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची बैठक झाली. 

२) त्यात मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती करताना झाडे, पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश लोढा यांनी पालिकेला दिले.

क्षमता वाढवण्याचे होते नियोजन -

सध्याच्या फिरोजशाह मेहता उद्यानाच्या (हँगिंग गार्डन) खाली १८८७ मध्ये बांधलेल्या या जलाशयातून कुलाबा, फोर्ट, सीएसएमटी, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, सँडहर्स्ट रोड, गिरगाव, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन्सी रोड, ग्रँट रोडमधील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. 

दक्षिण मुंबईची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन या जलाशयाची पुनर्बांधणी प्रस्तावित होती. पुनर्बांधणीनंतर सध्याच्या जलाशयाची दररोज सुमारे १५० दशलक्ष लीटरची पुरवठा क्षमता १९० दशलक्ष लीटरपर्यंत वाढवण्याची योजना होती. 

...मग घाट कशासाठी?

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा १८५.९४ कोटी रुपयांचा प्रकल्प २०१७ मध्ये प्रस्तावित होता. हा खर्च आता ७०० कोटींवर पोहोचला होता. या जलाशयाच्या पाच टाक्यांची जलधारण क्षमता एकूण १४७.७८ दशलक्ष लीटर असताना त्यातील केवळ ७९.७३ दशलक्ष लीटर पाणीसाठाच वापरला जातो. 

मग नवीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचा घाट पालिकेने का घातला, असा प्रश्न उपस्थित केला जात  होता. जलाशयाच्या नवीन टाकीसाठी हँगिंग गार्डन परिसरातील ३९३ झाडांची कत्तल करण्यात येणार होती.

Web Title: repair of malabar hill reservoir now the municipality will cancel the tender for reconstruction in mumbai 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.