वरळी किल्ल्याची डागडुजी... संवर्धनासाठी 63 लाख 49 हजार खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:25 PM2022-02-28T23:25:30+5:302022-02-28T23:26:18+5:30
वरळीतील किल्ला हा पुरातन ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला आहे. या किल्ल्याची पाहणी केल्यानंतर स्थानिक शहर नियोजक, वास्तूविशारद यांनी त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी आराखडा जी-दक्षिण विभागाला सादर केला होता
मुंबई - वांद्रे किल्ला येथे ट्री हाऊस बांधण्याचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीने मंजूर केला आहे. त्यांनतर आता वरळी किल्ल्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे. कोळीवाड्याच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी वरळी किल्ल्याचे जतन व संवर्धनासाठी ६३ लाख ४९ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.
वरळीतील किल्ला हा पुरातन ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला आहे. या किल्ल्याची पाहणी केल्यानंतर स्थानिक शहर नियोजक, वास्तूविशारद यांनी त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी आराखडा जी-दक्षिण विभागाला सादर केला होता. जी दक्षिण विभागाने आराखडा तयार करुन निविदा मागवली होती. त्यानुसार पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. देवांग कंस्ट्रक्शन या कंपनीला किल्ल्याच्या डागडुजीसाठी ६३ लाख ४९ हजार रुपये दिले जाणार आहेत. किल्ल्याची जागा राज्य शासनाच्या सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या अखत्यारित येत असल्याने त्यांचे ना-हरकत प्राप्त करण्यात आले आहे.
* वरळी कोळीवाडा गावाच्या उत्तरेकडील टोकावर वरळीचा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी सन १५६१ च्या सुमारास वरळी टेकडीवर बांधला. त्यावेळीस शहर फक्त सात बेटांनी बनले होते.
* हा किल्ला शत्रू जहाजे आणि समुद्री चाच्यांचा शोध म्हणून वापरला जात असे. किल्ल्यामध्ये एक विहीर, एक मंदिर आहे आणि किल्ल्यावरुन तसेच वांद्रे सागरी सेतू यांचे विहंगम दृश्य दिसते.
* किल्ल्याची तटबंदी हे तोफांसाठीचे व्यासपीठ आहेत. हा किल्ला मुंबईच्या पश्चिम किना-यावरील माहिमच्या खाडीपासून लक्ष्य वेधणा-या तीन किल्ल्यांपैकी एक आहे. ज्याच्या उत्तरेस माहिम किल्ला आणि वांद्रे किल्ला आहे.