मुंबईतील सर्वात जुन्या पुलांची लवकरच दुरुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 06:42 AM2019-09-15T06:42:13+5:302019-09-15T06:42:20+5:30

पावसाळा संपताच धोकादायक पुलांच्या दुरुस्तीला वेग मिळणार आहे. सात धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणी, दुरुस्तीचा प्रस्ताव नुकताच मंजूर झाला.

Repair of oldest bridges in Mumbai soon | मुंबईतील सर्वात जुन्या पुलांची लवकरच दुरुस्ती

मुंबईतील सर्वात जुन्या पुलांची लवकरच दुरुस्ती

Next

- शेफाली परब-पंडित 
मुंबई : पावसाळा संपताच धोकादायक पुलांच्या दुरुस्तीला वेग मिळणार आहे. सात धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणी, दुरुस्तीचा प्रस्ताव नुकताच मंजूर झाला. त्याचबरोबर, आता प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाची दुरुस्तीही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, तसेच पिलरला डंपरचा धक्का बसल्यामुळे कमकुवत झालेला रे रोड पूलही दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येईल. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये मुंबईत वाहतूककोंडीची शक्यता आहे.
१४ मार्च, २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून सात लोकांचा मृत्यू झाला होता. हा पूल स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये चांगल्या स्थित असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे या दुर्घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा एकदा आॅडिट करण्यात आले. त्यानुसार, धोकादायक पुलांची यादी नव्याने तयार करण्यात आली. या पुलांची टप्प्याटप्प्याने दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्यात येत आहे.
सात पुलांच्या दुरुस्तीला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. १९६७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रिन्सेस स्ट्रीट पुलाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. मरिन लाइन्स आणि मरिन ड्राइव्हला जोडणारा हा पूल दक्षिण मुंबईत सर्वात महत्त्वाचा पूल म्हणून ओळखला जातो. या पुलाखालील दुरुस्तीची कामे गेल्या महिन्यापासून सुरू आहे.
दरम्यान, बुधवारी रे रोड येथील पुलाच्या पिलरवर डम्पर धडकला. यामुळे पुलाला धोका निर्माण झाल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या या पुलाचे आॅडिट करण्यास स्ट्रक्टवेल कंपनीला सांगण्यात आले. या कंपनीने केलेल्या सूचनेनुसार पुलाच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी पालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेला जोडणाºया रे रोड रेल्वे स्थानकावरील हा पूल पुढील दहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
>अतिक्रमण हटविणार...
रे रोड पुलावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. मात्र, हा पूल धोकादायक झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे पुलावरील आणि पुलाखालचे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. ११० वर्षे जुना असलेल्या या पुलाच्या आसपास चारशे झोपड्या आहेत. या कारवाईसाठी पोलीस संरक्षण घेण्यात आले आहे.
>काही भाग वाहतुकीस बंद करा; पालिकेकडून वाहतूक पोलिसांना विनंती
>मरिन लाइन्स आणि मरिन ड्राइव्हला जोडणारा हा पूल दक्षिण मुंबईत सर्वात महत्त्वाचा पूल म्हणून ओळखला जातो. या पुलाखालील दुरुस्तीची कामे गेल्या महिन्यापासून सुरू आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी या पुलाचा काही भाग वाहतुकीसाठी बंद करण्याची विनंती वाहतूक पोलिसांना महापालिका करणार आहे. त्याचबरोबर, पुलावरील दुरुस्ती करताना येथील वाहतूक पूर्णत: बंद करावी लागणार असल्याचे पालिकेतील एका अधिकाºयाने सांगितले.
या पुलांचीही दुरुस्ती : वांद्रे पूर्व येथील हन्सभुर्ग पाइपलाइनजवळील पूल, वांद्रे-पश्चिम जुहूतारा रोड एनएनडीटीसमोरील पूल, अंधेरी पूर्व धोबीघाट मजास नाले पूल, अंधेरी पूर्व मजास नाल्यावरील मेघवाडी जंक्शन पूल, गोरेगाव पश्चिम पीरामल नाला, इन-आॅर्बिट मॉलजवळ, मालाड लिंक रोड डी-मार्टजवळील पूल, बोरीवली रतननगर, दहिसर नदी पूल. महत्त्वाचे पूल वाहतुकीसाठी बंद राहिल्यास अन्य मार्गांवरील ताण वाढतो. यामुळे महापालिकेने आठ महिन्यांच्या कालावधीत या पुलांचे काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदारांना दिली आहे.

Web Title: Repair of oldest bridges in Mumbai soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.