मुंबईः मुसळधार पावसानं रेल्वे ट्रॅकवर जागोजागी पाणी साचलं आहे. त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झालाय. अशातच रेल्वे रूळ तुटण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे रेल्वे कर्मचा-यांनाही ते दुरुस्त करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतेय. परंतु मानखुर्दमध्ये रेल्वेच्या कर्मचा-यांनी तुटलेले रूळ दुरुस्त करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.हार्बर रेल्वे मार्गावर मानखुर्द ते गोवंडीदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेले. त्यानंतर रुळाला गेलेले तडे दुरुस्त करण्यासाठी चक्क कर्मचा-यांनी फडक्याचा वापर केला. मानखुर्दमध्ये रेल्वे रुळाला तडे गेल्यानंतर रेल्वे कर्मचा-यांनी चक्क तुटलेल्या भागांना फडक्यानं बांधण्याचा प्रयत्न केल्यानं अनेक स्तरांतून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर चहूबाजूंनी टीका होतेय. विशेष म्हणजे चिंधी बांधून रेल्वे कर्मचा-यांनी रेल्वे रूळ दुरुस्त करण्याची चिंधीगिरी केल्यानं प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय.चिंधी बांधलेल्या त्या रुळावरून रेल्वे प्रशासनानं ट्रेनही चालवली आहे. तात्पुरती मलमपट्टी करत मुंबईकरांच्या जिवाशी खेळ करण्याचा रेल्वेनं प्रयत्न केला. अशा फडके बांधलेल्या रूळावरून लोकलही धावली रेल्वे प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. रेल्वे प्रशासनानं वेळीच खबरदारी घेऊन अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समीर जव्हेरी यांनी केली आहे.
रेल्वे रूळ दुरुस्त करण्यासाठी कर्मचा-यांची 'चिंधी'गिरी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 7:40 PM