सायन उड्डाणपुलाची दुरुस्ती पाचऐवजी दीड महिन्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 01:56 AM2020-03-01T01:56:37+5:302020-03-01T01:56:41+5:30
मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला एमएसआरडीसीला आधी पाच महिन्यांचा कालावधी लागणार होता.
योगेश जंगम
मुंबई : मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला एमएसआरडीसीला आधी पाच महिन्यांचा कालावधी लागणार होता. मात्र प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एमएसआरडीसीने जॅकच्या संख्येमध्ये वाढ करत हेच काम दीड महिन्यामध्ये करण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांच्यासोबत केलेली बातचीत....
उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे आव्हानात्मक काम दीड महिन्यामध्ये कसे पूर्ण करणार?
दुरुस्तीच्या कामात सायन पुलाचे १६० बेअरिंग बदलायचे आहेत. आधी एक गर्डर उचलण्यासाठी सहा जॅकचा वापर केला जाणार होता, त्यामुळे हे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल पाच महिन्यांचा अवधी लागला असता. मात्र प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जॅकच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता चाळीस जॅकच्या साहाय्याने दुरुस्ती सुरू आहे. यामुळे हे काम आता दीड महिन्यात पूर्ण होईल.
हे काम सुरू करण्यापूर्वी नियोजन कसे केले आणि किती खर्च येणार आहे?
या दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामापूर्वी आम्ही परिसरामध्ये वाहतुकीसाठी चिन्हांचे बोर्ड, वाहतूक वळविलेले मार्ग आणि चिन्हे त्या ठिकाणी बसवण्यात आली. वाहतूक पोलिसांचेही सहकार्य मिळत आहे.
> ब्लॉक दरम्यान वाहतूक कशी असेल ?
वीकेण्ड दरम्यान दुरुस्तीचे काम होत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. तसेच वाहतूक पोलिसांनी आणिक आगारकडून मार्गिका सुचवली
असून पुलाच्या खालून मार्गिका सुरूच आहे.
७ एप्रिलपर्यंत वीकेण्डला ब्लॉक घेण्यात येतील. आतापर्यंत वाहतुकदारांनी जसे सहकार्य केले
तसेच सहकार्य करावे आणि वाहतूक पोलिसांच्या सल्ल्यानुसार पर्यायी रस्त्यांचा वापर करावा.
>आतापर्यंत दोन ब्लॉक घेत वेळेमध्ये काम पूर्ण केले आहे. यामुळे मुंबईकरांची मोठी गैरसोय टळली आहे. - शशिकांत सोनटक्के