दुरुस्तीच्या कामासाठी घाटकोपर स्थानकावरील जिना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 07:19 AM2019-04-12T07:19:43+5:302019-04-12T07:19:46+5:30
१८ एप्रिलपासून काम सुरू : पायऱ्यांसह खांबांची पुनर्बांधणी, पर्यायी पुलांवरील गर्दी वाढणार
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर स्थानकावरील कल्याण दिशेकडील फलाट क्रमांक १ ला जोडणारा जिना १८ एप्रिलपासून ते ४ मेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत जिन्यांवरील पायºया, खांब यांची पुनर्बांधणी करण्यात येईल.
सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने पूल, फलाट दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे हाती घेतली आहेत. याच पार्श्वभूमीवर घाटकोपर स्थानकातील सीएसएमटी दिशेकडील जाणाºया जिन्याचे काम याआधीच हाती घेण्यात आले आहे. सीएसएमटी दिशेकडील फलाट क्रमांक २ आणि ३ यांना जोडणारा जिना ५ एप्रिलपासून बंद करण्यात आला आहे. हा जिना १७ एप्रिलपर्यंत बंद राहील. त्यातच आता कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या जिन्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी १८ एप्रिलपासून हाती घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील गर्दीच्या स्थानकांपैकी घाटकोपर हे एक स्थानक आहे. या स्थानकावरून मेट्रोला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे या दोन पादचारी पुलांच्या जिन्यांचे काम सुरू झाल्यानंतर स्थानकांवर गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. जिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे गर्दीचा भार इतर पादचारी पुलांवर येणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील हे पूलही राहणार दुरुस्तीसाठी बंद
पश्चिम रेल्वे मार्गावरील नायगाव, नालासोपारा आणि दादर स्थानकावरील पादचारी पुलाचे जिने १३ एप्रिलपर्यंत बंद करण्यात येणार आहेत. नालासोपारा स्थानकावर विरार दिशेकडील जीर्ण झालेल्या पुलाच्या जागेवर नवा पादचारी पूल ६ एप्रिलपासून सुरू करण्यात आला आहे. नव्या पादचारी पुलाचा वापर वाढविण्यासाठी फलाट क्रमांक ४ वरील चर्चगेट दिशेकडील जुना पादचारी पुलाचा जिना १३ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. दादर स्थानकावरील टिळक रोडवरील चर्चगेट दिशेकडील पादचारी पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी १३ एप्रिल ते ११ जुलैपर्यंत पादचारी पूल बंद ठेवण्यात आला आहे. तर, नायगाव स्थानकावरील जुना जीर्ण पादचारी पुलाच्या जागेवर ६ एप्रिल रोजी नवा पादचारी पूल उभारला आहे. या पुलाचा वापर वाढविण्यासाठी १३ एप्रिलला दुसरा पादचारी पूल बंद करण्यात येईल.