सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम चार महिन्यांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 06:58 AM2019-08-27T06:58:41+5:302019-08-27T06:58:47+5:30

कंत्राटदाराच्या नियुक्तीनंतरही मुहूर्त मिळेना; दररोज लाखो प्रवासी करतात ये-जा, अपघाताची भीती

The repair work of the Sion Airport was postponed for four months | सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम चार महिन्यांपासून रखडले

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम चार महिन्यांपासून रखडले

Next

मुंबई : सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडले आहे. मुंबईतील महत्त्वाच्या असलेल्या या उड्डाणपुलावरून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. या पुलाची दुरुस्ती करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) अनेकदा जाहीर करण्यात आले आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून अद्याप दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकलेले नाही. यामुळे जर एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल प्रवाशांमधून विचारण्यात येत आहे.


सायन उड्डाणपुलाच्या कठड्याच्या बाहेरील भागातून १० बाय १५ सें.मी. भागातील प्लास्टरचा काही भाग मार्च महिन्यामध्ये खाली
पडला होता. यानंतर सायन उड्डाणपुलाचे आयआयटी मुंबई यांच्यामार्फत स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले.
आयआयटीच्या अहवालात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार, महामंडळाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती केली. आयआयटीच्या अहवालानंतर एमएसआरडीसीमार्फत या पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम एप्रिल महिन्यात हाती घेण्यात येणार होते. यासाठी दीड महिन्यासाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार होती. मात्र यासाठी आवश्यक असलेले साहित्य न मिळाल्याने हे काम सुरू करता आले नसल्याचे एमएसआरडीसीमार्फत सांगण्यात आले. चार महिने उलटूनही हे काम सुरू होऊ शकलेले नाही. आता सप्टेंबर महिन्यात हे काम सुरू करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीमार्फत सांगण्यात येत आहे.


वाशी, नवी मुंबई आणि पुढे पुण्याला जाण्यासाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामुळे पुलावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. पूल दुरुस्ती रखडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अवजड वाहनांची वाहतूक बंद
उड्डाणपुलाच्या दुरुस्तीवेळी वाहतुकीचे नियोजन करावे लागेल. यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांसोबत बैठकाही पार पडल्या आहेत. बेअरिंग बदलण्यात येणार असल्याने तोपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणपुलावरील जड वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांना निर्देश देण्यात आले. त्यानुसार अजूनही अवजड वाहनांची वाहतूक या उड्डाणपुलावरून बंद आहे.

Web Title: The repair work of the Sion Airport was postponed for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.