Join us

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला पंधरा दिवसांमध्ये होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 2:42 AM

पुलाखाली होणार वाहतूककोंडी

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम येत्या १५ दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी आवश्यक असलेले जॅक एमएसआरडीसीकडे आल्यावर दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात येईल, असे एमएसआरडीसीच्या वतीने सांगण्यात आले. या पुलाच्या दुरुस्तीपूर्व कामांना आता सुरुवात करण्यात आली आहे.

येत्या १५ दिवसांमध्ये सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याने एमएसआरडीसीतर्फे वाहतूक विभागाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. वाहतूक विभागाच्या निर्देशानुसार या मार्गावर वाहतुकीमध्ये बदल करून ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामाला सुरुवात झाल्यावर ४५ दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे या कामामध्ये प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागू शकते.

दुरुस्ती काळात या उड्डाणपुलाचे १७० बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम जॅकच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना डिसेंबर २०१८ पासून बंदी घालण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम सुरू झाल्यावर सर्वच वाहनांना उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

वाहतूक विभागाच्या वतीने वाहतुकीचा अभ्यास करून वाहतूक वळविण्याबाबत आणि ब्लॉक घेण्याबाबत एमएसआरडीसीला कळविण्यात येणार आहे. यापूर्वी २८ मार्च २०१९ ला या पुलाच्या स्लॅबचा प्लास्टरचा १० बाय १५ सेंमीचा तुकडा कोसळल्यानंतर एप्रिलमध्ये दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात येणार होते, मात्र तेही लांबले. नवी मुंबई आणि पूर्व उपनगरातून शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या हजारो वाहनांना या पुलाचा वापर करावा लागतो. या पुलाच्या दुरुस्तीच्या काळामध्ये सायन सर्कलमध्ये वाहतूककोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

 

टॅग्स :मुंबईवाहतूक कोंडी