नेरळ : नेरळजवळील कोल्हारे ग्रामपंचायतमधील बोरले आाणि उक्रूळ ग्रामपंचायतमधील तलावांचे रायगड जिल्हा परिषदेने सेस फंडातून संवर्धन करण्याचे काम सुरु केले आहे . त्यातील बोरले येथील गाव तलावाचे काम लघु पाटबंधारे विभागाने पूर्ण केले आहे. अशाच प्रकारे तालुक्यातील पंचवीस ठिकाणी असलेल्या तलावांचे संवर्धन जिल्हा परिषदेने करण्याची गरज निर्माण झाली आहे . तालुक्यातील अनेक गावात गाव तलाव आहेत, पण तलावातील साचलेली माती ब-याच वर्षांपासुन बाहेर न काढल्यामुळे गाळात रु तून गेले आहेत. त्या सर्व तलावांचे संवर्धन होण्याची गरज आहे. पण सरकारी निधीअभावी अशी कामे पूर्ण होणे अशक्य आहे. रायगड जिल्हा परिषदेवर स्वीकृत सदस्य म्हणून घेतलेल्या राजेश जाधव यांनी आपल्या कोल्हारे ग्रामपंचायतीमधील बोरले गावामध्ये असलेल्या गाव तलावासाठी नवीन प्रस्ताव मांडला. मात्र संवर्धन आणि सुशोभीकरण कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करता येत नसल्याने जाधव यांनी आपला सेस निधी तेथे खर्च करण्याचा निर्णय घेतला. साधारण तीस गुंठे क्षेत्रात असलेल्या बोरले येथील गाव तलावाच्या पुनर्निर्मितीमुळे रायगड जिल्हा परिषदेने कामाचा नवीन पर्याय समोर ठेवला आहे . नऊ लाखाचा सेस निधी खर्च करून रायगड जिल्ह्यात आदर्शवत असा गाव तलाव निर्माण केला आहे . तलावातील गाळ काढून पाण्याचा साठा अधिक राहावा ,तसेच कधीही तलावाची बांध - बंदिस्ती खराब होऊ नये यासाठी तलावात आणि बाहेरच्या बाजूला दगडी बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे . ते करतांना पाणीसाठा अधिक होण्यासाठी जमिनीपासून दोन मीटर उंचीचा बांध घालण्यात आला आहे . नव्याने तयार झालेल्या या गाव तलावाचे काम बघण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कोळी यांनी येवून पाहणी केली . त्यांनी अशी कामे जिल्ह्यात होण्यासाठी बोरले तलाव हे आदर्श मॉडेल ठरावे ,अशी अपेक्षा व्यक्त केली . कर्जत तालुक्यात त्या नंतर जिल्हा परिषद सदस्य आणि बांधकाम समितीचे सभापती उत्तम कोळंबे यांनी आपल्या प्रभागातील उक्रूळ गावातील गाव तलावाचे संवर्धनाचे काम वीस लाखाचा सेस निधी वर्ग करून सुरु केले आहे .
सेस निधीतून तलावांची दुरुस्ती
By admin | Published: May 26, 2014 4:36 AM