मुंबई: एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. स्वप्निल लोणकरचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांना हा 19 लाख 96 हजार 965 रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे या कुटुंबीयांवर कर्ज होते.
आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा यामुळे हे कुटुंब त्रस्त होते. अखेर या कर्जाची रक्कम त्या कुटुंबीयांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.