अन्यायकारक आदर्श भाडेकरू कायदा रद्द करा; राहुल शेवाळे यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 06:43 PM2021-06-04T18:43:58+5:302021-06-04T18:44:22+5:30
खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, नव्या कायद्यनुसार भाडेकरूंना बाजारभावाने घरभाडे द्यावे लागणार आहे.
मुंबई: मुंबईसह देशभरातील भाडेकरूंसाठी अन्यायकारक असणारा नवा 'आदर्श भाडेकरू कायदा' त्वरित रद्द करावा, अशी लेखी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या कायद्यामुळे मुंबईतील सुमारे 15 हजार भाडेकरूंना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचे खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, नव्या कायद्यनुसार भाडेकरूंना बाजारभावाने घरभाडे द्यावे लागणार आहे. तसेच सलग दोन महिन्यांचे भाडे न दिल्यास घरमालक भाडेकरूला घरातून काढू शकेल. तसेच भाडेकरूने घर खाली करण्यास नकार दिल्यास दुप्पट भाडे आकारले जाईल. कायद्यातील या तरतुदी जाचक असून सामान्य भाडेकरूंवर अन्याय करणाऱ्या आहेत.
आदर्श भाडेकरू कायदा हा अन्यायकारक असून त्याचा निषेध शिवसेनेच्या वतीने गल्लीपासून दिल्लीपर्यंत करण्यात येईल. लोकसभेतही याविरोधात आवाज उठवून हा कायदा मागे घेण्यास केंद्र सरकारला आम्ही भाग पाडू. - खासदार राहुल शेवाळे