पुन्हा अवकाळी!
By admin | Published: April 5, 2015 01:48 AM2015-04-05T01:48:09+5:302015-04-05T01:48:09+5:30
कोरड्या हवामानानंतर राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारांचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
मुंबई : कोरड्या हवामानानंतर राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारांचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि विदर्भात गारा पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरातील वातावरणीय बदल, हवेतील आर्द्रतेचे कमी-अधिक होणारे प्रमाण आणि पृष्ठभागावरील तापमानात होणारी वाढ; या घटकांमुळे राज्यात अवकाळी पावसासह गारा पडत होत्या. दरम्यानच्या काळात उत्तर भारताच्या टोकावर पडलेल्या पावसामुळे हवामानात पुन्हा बदल झाले आणि कमाल, किमान तापमानात घट झाली. परंतु आता पुन्हा झालेल्या वातावरणीय बदलामुळे ५ आणि ६ एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
७ एप्रिल रोजी मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. तर ८ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. शिवाय याच दिवशी विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. तर पुढील ४८ तासांसाठी मुंबईत आकाश निरभ्र राहील आणि कमाल, किमान तापमान अनुक्रमे ३३, २२ अंशाच्या आसपास राहील. (प्रतिनिधी)
पाणी सोडण्यासाठी
धरणे बांधली का ?
अहमदनगर : निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे अर्धवट असल्याने धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याशिवाय पर्याय नाही. मात्र जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी धरण बांधले का, असा सवाल माजी मंत्री मधुकर पिचड यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
कूपनलिकांना
६0 मीटरचे निकष
जळगाव : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ७६ अतिशोषित व ४ शोषित पाणलोट क्षेत्रात सिंचन व औद्योगिक वापरासाठी ६० मीटरपेक्षा अधिक खोल विंधनविहिरी व कूपनलिका खोदण्यास प्रतिबंध घालण्याचा निर्णय महाराष्ट्र भूजल प्राधिकरणाने घेतला आहे.