गर्दीच्या ठिकाणी महिलेला वारंवार धक्का देणे म्हणजे गुन्हाच, तरुणाला एक वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:31 AM2017-10-03T04:31:17+5:302017-10-03T04:31:29+5:30
गर्दीच्या ठिकाणी महिलेला वारंवार धक्का देणे म्हणजे गुन्हाच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय देत, विशेष पॉक्सो न्यायालयाने एका २४ वर्षीय तरुणाला, दोन अल्पवयीन मुलींना गर्दीच्या ठिकाणी वारंवार धक्का दिल्याने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.
मुंबई : गर्दीच्या ठिकाणी महिलेला वारंवार धक्का देणे म्हणजे गुन्हाच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय देत, विशेष पॉक्सो न्यायालयाने एका २४ वर्षीय तरुणाला, दोन अल्पवयीन मुलींना गर्दीच्या ठिकाणी वारंवार धक्का दिल्याने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.
दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ व त्यांचा पाठलाग केल्याप्रकरणी वडाळ्याचा सद्दाम शेख (२४) याला विशेष पॉक्सो (प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल आॅफेन्सेस)अंतर्गत एक वर्षाची शिक्षा ठोठावली.
संबंधित ठिकाणी खूप गर्दी असल्याने दोन्ही मुलींना चुकून धक्का लागला, असा युक्तिवाद या तरुणातर्फे न्यायालयात करण्यात आला. मात्र, न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळला. तरुणाने पीडितेला एकदाच धक्का दिला असता, तर तो चुकून लागला, असे गृहीत धरता आले असते. मात्र, त्याने हे कृत्य वारंवार केले. त्यामुळे त्याचा हेतू काय होता, हे स्पष्ट झाले आहे. त्याला मुलींचा विनयभंग करायचा होता, असे म्हणत, विशेष न्यायालयाने सद्दाम शेख याला एक वर्षाची शिक्षा ठोठावली.
तक्रारीनुसार, २६ आॅगस्ट २०१५ रोजी १४ वर्षीय पीडिता संध्याकाळी ट्युशनमधून निघाल्या होत्या. संध्याकाळी ७.१० वाजता आरोपीने एका पीडितेच्या डाव्या हाताला धक्का दिला. चुकून धक्का लागला असेल, असे समजून पीडितेने दुर्लक्ष केले. त्या दोघीही पुढे चालत गेल्या. मात्र, शेखने पाठलाग केला. दुसºया मुलीला धक्का दिला. पुन्हा पीडित मुलींनी दुर्लक्ष केले. मात्र, त्याने पुन्हा धक्का दिला. त्यामुळे मुलींनी आरडाओरडा केला. तो ऐकून लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
केसमध्ये गोवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही
या दोघींपैकी आरोपीला कोणीही ओळखत नव्हते. त्यामुळे आरोपीला नाहक या केसमध्ये गोवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर पीडितांची साक्ष विश्वासार्ह असेल, तर त्या आधारे आरोपीला शिक्षा ठोठावली जाऊ शकते. या केसमध्ये पीडितांची साक्ष विश्वासार्ह आहे, असे म्हणत, न्यायालयाने सद्दाम शेख याला शिक्षा ठोठावली.