प्रशासनास शिस्त लावणाऱ्या आयुक्तांची बदली
By Admin | Published: January 4, 2015 12:09 AM2015-01-04T00:09:07+5:302015-01-04T00:09:07+5:30
प्रशासनास शिस्त लावणारे आयुक्त म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आबासाहेब जऱ्हाड यांची राज्य शिक्षण आयुक्त म्हणून पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
नवी मुंबई : सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या कामासही प्राधान्य देणाऱ्या व प्रशासनास शिस्त लावणारे आयुक्त म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आबासाहेब जऱ्हाड यांची राज्य शिक्षण आयुक्त म्हणून पुणे येथे बदली करण्यात आली आहे. शहरातील रखडलेला कचरा वाहतुकीचा प्रश्नावर तोडग्यासह इतर अनेक चांगली कामे त्यांच्या काळात मार्गी लागली.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून दीड वर्षापुर्वी रूजू झालेल्या जऱ्हाड यांनी महापालिकेमधील कारभारास शिस्त लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. शहरातील विकासकामे करताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून वस्तूस्थिती पाहण्यावर ते भर देत होते. काम करण्याची आवश्यकता असेल तरच ते करण्यावर भर दिला होता. दोन दिवसांपुर्वी त्यांनी एनएमएमटीच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यांनी यापूर्वी स्वत: एनएमएमटीमधून प्रवास करून पाहणी केली होती. पालिकेत रूजू झाल्यापासून दिघा ते बेलापूरपर्यंतचा सर्व विभाग त्यांनी पिंजून काढला.
मोरबे धरणापासून सर्व ठिकाणी पाहणी करून कामांवर लक्ष ठेवले होते. यामुळे पालिका मुख्यालयाचे रखडलेले काम मार्गी लागले. स्थायी समितीमध्ये विठ्ठल मोरे व त्यांचा वाद गाजला. अधिकाऱ्यांमध्ये जऱ्हाडांनी चांगलीच जरब निर्माण केली होती. (प्रतिनिधी)
महापालिका क्षेत्रातील अनुभवाविषयी माहिती देताना आबासाहेब जऱ्हाड यांनी सांगितले की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दिड वर्ष काम करण्याची संधी मिळाली. या कालावधीमध्ये मुख्यालयासह, कचऱ्याचा प्रश्न ,एमआयडीसीतील रस्ते व इतर समस्या सोडविण्यात आल्या. सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे समाधान आहे.