डम्पर कारवर उलटल्याने तरुणाचा मृत्यू, डम्परचालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:08 AM2019-01-18T06:08:31+5:302019-01-18T06:08:35+5:30
भार्इंदरच्या नवघर येथील मामेभाऊ शेखर पाटील आणि तेथून राई गावातील बहिणीकडे तीळगूळ देऊन सुमित कारने ठाण्यात जात होते
मीरा रोड : बहीण, भावास तीळगूळ देऊन घरी परतताना भरधाव डम्पर कारवर उलटल्याने ठाण्यातील बाळकुम येथील सुमित पाटील (३०) यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडबंदर महामार्गावर घडली. पोलिसांनी आरोपी डम्परचालकास अटक केली आहे.
भार्इंदरच्या नवघर येथील मामेभाऊ शेखर पाटील आणि तेथून राई गावातील बहिणीकडे तीळगूळ देऊन सुमित कारने ठाण्यात जात होते. दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्यांची कार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर खिंडीजवळ असताना बाजूने आलेला मातीचा डम्पर दुभाजकावर चढून सुमित यांच्या कारवर उलटला. त्यामुळे चेपलेल्या कारमध्ये दबून सुमितचा मृत्यू झाला. घटनेनंतर डम्परचालक पळून गेला. या अपघातामुळे ठाणे व वसई-गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. सुमारे तासभर वाहतूक बंद असल्याने कोंडी होऊन थेट दहिसर चेकनाक्यापर्यंत वाहनांची रांग लागली होती. वाहतूक व काशिमीरा पोलिसांनी डम्पर बाजूला केल्यानंतर वाहतूक हळूहळू सुरू झाली.
पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी डम्परचालक नरसिंह यादव (४५) याला अटक केली. तो मातीने भरलेला डम्पर बोरीवलीच्या टाटा पॉवर हाउस येथून घोडबंदर येथे टाकण्यासाठी नेत होता. या घटनेने बाळकुमसह राई-नवघर भागात शोककळा पसरली आहे. सुमित बांधकाम क्षेत्रात कार्यरत होते.
भरावमाफियांची दहशत
मुंबईच्या पश्चिम उपनगरातून दहिसर चेकनाका ओलांडून माती, डेब्रिस, दगड भरलेले डम्पर भरधाव, ओव्हरलोड व नियमांचे उल्लंघन करून दिवसरात्र धावत असतात. मुंबई उपनगरातून आणलेली माती, डेब्रिस घोडबंदर, वसई, चेणे, वरसावे आदी भागांत बेकायदा टाकत असतात. पोलीस, महसूल आणि पालिकेचे या भरावमाफियांशी साटेलोटे असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप या घटनेच्या पार्श्वभूमीवर होत आहे.