विठ्ठल मंदिराची प्रतिकृती सापडली
By admin | Published: September 24, 2015 02:01 AM2015-09-24T02:01:43+5:302015-09-24T02:01:43+5:30
विठ्ठल मंदिरामध्ये ‘क्षेत्रोपाध्याय’ या सेवेकराचा मान नाझरकर कुटुंबीयांकडे होता हे सिद्ध करण्यासाठी १८६० ते १८७२ च्या दरम्यान रंगोबानाथ नाझरकर यांनी मंदिराची तयार केलेली लाकडी
पंढरपूर : विठ्ठल मंदिरामध्ये ‘क्षेत्रोपाध्याय’ या सेवेकराचा मान नाझरकर कुटुंबीयांकडे होता हे सिद्ध करण्यासाठी १८६० ते १८७२ च्या दरम्यान रंगोबानाथ नाझरकर यांनी मंदिराची तयार केलेली लाकडी प्रतिकृती सापडल्याचा दावा रंगोबानाथ यांचे पणतू गणेश नाझरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
नाझरकर परिवाराला ‘क्षेत्रोपाध्याय’ नावाचे सेवेकरी असल्याचा मान होता. मात्र त्यावेळच्या बडव्यांनी हा मान नाकारला होता. त्याविरोधात नाझरकर न्यायालयात गेले. बडव्यांनी दावा केला की, नाझरकर यांनी कधी मंदिरात प्रवेश केला नाहीच, त्यामुळे न्यायालयाने नाझरकर यांना मंदिराच्या आतील रचना कशी आहे हे सांगा, असा आदेश दिला. त्यामुळे रंगोबानाथ यांनी मंदिराच्या आतील रचनेची लाकडी प्रतिकृती तयार करून न्यायालयात सादर केली. त्यावरून नाझरकर यांना मंदिराच्या आतील रचनेची माहिती होती व त्यांनी अनेकवेळा मंदिरात प्रवेश केल्याचे सिद्ध झाले होते, असे त्यांनी सांगितले.
विठ्ठल मंदिराची प्रतिकृती नाझरकर यांच्या घरी होती. मात्र तिचे भाग सुटे असल्याने ते आजपर्यंत जोडता आले नव्हते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश नाझरकर यांनी ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केल्यावर ते जोडले गेले आहेत.
या जुन्या सागवानी लाकडी मंदिराची प्रतिकृती आठ फूट लांब व साडेचार फूट रुंद आहे. त्यामध्ये २० खांब, चांदीचा दरवाजा, रंगशिळ, पांडुरंगाची प्रभावळ आदी आहे. तसेच शिखर, काही बाजूच्या भिंती, पांडुरंगाची मूर्ती हे साहित्य हरवले असल्याची माहिती त्यांनी दिली.
बडवे, उत्पात, बेणारे, परिचारक असे विठ्ठलाची सेवा करणारे सात मानकरी जसे आहेत तशाच परंपरेतील मानकरी ‘क्षेत्रोपाध्याय’ होते, असा दावा नाझरकर यांनी केला आहे. ‘क्षेत्रोपाध्याय’ यांच्याकडे बिल्ला असायचा तो बिल्ला घेऊन येणाऱ्या नाझरकर परिवारातील व्यक्तीसोबत जितकी माणसे असायची त्यांना मंदिरात सोडण्यात येत होते, असा या ‘क्षेत्रोपाध्याय’चा मान होता, असे नाझरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)