'तुम्हाला अर्ध्या तासात प्रत्युत्तर देतो'; शिवसेना आमदारांच्या दिशेने बघत एकनाथ शिंदेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:40 PM2022-07-04T14:40:06+5:302022-07-04T14:42:01+5:30

बहुमत प्रस्तावावर मतदान सुरु असताना शिवसेनेकडून पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधण्यात आला.

Replies to you in half an hour; CM Eknath Shinde's warning looking towards Shiv Sena MLAs | 'तुम्हाला अर्ध्या तासात प्रत्युत्तर देतो'; शिवसेना आमदारांच्या दिशेने बघत एकनाथ शिंदेंचा इशारा

'तुम्हाला अर्ध्या तासात प्रत्युत्तर देतो'; शिवसेना आमदारांच्या दिशेने बघत एकनाथ शिंदेंचा इशारा

Next

मुंबई- विधानसभेत भाजपा आणि शिंदे यांच्या गटानं बहुमत जिंकलं. भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजपा-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. दरम्यान, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शाह फारूख अन्वर मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. 

बहुमत प्रस्तावावर मतदान सुरु असताना शिवसेनेकडून पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधण्यात आला. बंडखोर गटातील आमदार प्रताप सरनाईक मतदानासाठी उठले असता शिवसेनेचे आमदार ईडी-ईडी असं ओरडू लागले. तसेच यामिनी जाधव देखील मतदानाचा क्रमांक उच्चारण्यासाठी जागेवर उभ्या राहिल्या असता, ईडी-ईडी अशा घोषणा शिवसेनेचेच्या आमदारांकडून करण्यात आल्या. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांच्या दिशेने बघत, तुम्हाला अर्ध्या तासात प्रत्युत्तर देतो, असा इशारा दिला.

मविआ सरकारच्या पहिल्या दिवसापासून सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. नियती कुणालाही सोडत नाही. ज्यांच्यामागे ईडी लावली त्यांच्याच घराखाली केंद्र सरकारचे पहारे देऊन संरक्षण द्यावे लागतेय, असा टोला शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव म्हणाले. तसेच माझे बोलणं ऐकून घेतलं जाणार नाही हे माहिती आहे कारण वर्मावर घाव पडतोय. राष्ट्रवादीसोबत ८० तास सत्ता केली तेव्हा हिंदुत्व कुठे गेले? मराठी माणसांवर ईडी लावली जाते. संजय राऊत, अविनाश भोसले, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांच्यासह सगळ्या मराठी माणसांवर ईडी लावली, असं भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, शिवसेना संपतेय हे दिसत असल्यानंच हे पाऊल उचललं. आम्ही बंड केलेलं नाही उठाव केला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमचा पक्ष एक नंबरला होता. आता दोन वर्षात आम्ही चार नंबरला गेलो, असं शिंदे गटातील बंडखोर आमदार गुलाबराव पाटील म्हणाले. बाळासाहेब आमच्या हृदयात होते, आहेत आणि राहतील, असंही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितलं. 

शिवसेना कधीही संपणार नाही- शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे

शिवसेना कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीपेक्षाही जास्त ताकद घेऊन विधानभवनात येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वास शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. २० मे रोजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याबाबत विचारलं होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. 

Read in English

Web Title: Replies to you in half an hour; CM Eknath Shinde's warning looking towards Shiv Sena MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.