याचिकाकर्तीचा आज जबाब नोंदविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 03:24 AM2021-04-07T03:24:04+5:302021-04-07T03:24:58+5:30
याचिकाकर्ती जयश्री पाटील यांना जबाब नोंदविण्यासाठी पाचारण केले आहे. बुधवारी त्याबाबत बीकेसीतील कार्यालयात सविस्तर जबाब घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीबीआय) अधिकाऱ्यांचे एक पथक मंगळवारी दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. त्यांनी यासंबंधीची न्यायालयाने दिलेला आदेशाची प्रत व याचिकेची कागदपत्रे ताब्यात घेतली. याचिकाकर्ती जयश्री पाटील यांना जबाब नोंदविण्यासाठी पाचारण केले आहे. बुधवारी त्याबाबत बीकेसीतील कार्यालयात सविस्तर जबाब घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझेला १०० कोटी वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला होता. त्याबाबत सीबीआय चौकशी करण्याबाबत ॲड. पाटील यांची याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी सीबीआयला १५ दिवसात प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सीबीआयचे चार आधिकाऱ्यांचे पथक दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. त्यांना पहिल्या टप्प्यात तपासाला आवश्यक असलेल्या सर्व प्राथमिक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जयश्री पाटील यांची तक्रार नोंदवून घेतली जाईल. त्यानंतर आरोपांशी संबंधित नमूद पोलीस उपायुक्त राजू भुजबळ, एसीपी पाटील यांच्याकडे चौकशी केली जाईल. परमबीर सिंग यांचाही जबाब नोंदविण्यात येणार आहे. ते महासंचालक दर्जाचे अधिकारी असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर त्यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत दिल्लीतून वरिष्ठ आयपीएस अधिकारी येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात येईल, असे सांगण्यात आले.