स्टॅन स्वामी यांच्या जामीन अर्जावर उत्तर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:10 AM2020-12-05T04:10:40+5:302020-12-05T04:10:40+5:30
स्टॅन स्वामी यांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे एनआयएला निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणात आरोपी असलेले ...
स्टॅन स्वामी यांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे एनआयएला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणात आरोपी असलेले फादर स्टॅन स्वामी यांनी केलेल्या जामीन अर्जावर एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश विशेष न्यायालयाने एनआयएला दिले.
स्टॅन स्वामी यांनी त्यांची बॅग आणि हार्ड डिस्कची क्लोन कॉपी देण्याचे निर्देश एनआयएला द्यावेत, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय तळोजा कारागृहामधून अन्य कोणत्याही कारागृहात त्यांना पाठवण्यात येऊ नये, असे निर्देशही कारागृह प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती स्वामी यांनी न्यायालयाला केली. या अर्जांवर एनआयएचे वकील प्रकाश शेट्टी यांनी आक्षेप घेतला. अनेक अर्ज दाखल करून स्वामी न्यायालयावरील कामकाजाचे ओझे वाढवत असल्याचे सांगितले.
आजारपणामुळे हात थरथरत असल्याने पाण्याचा ग्लास हातात धरणे शक्य नसल्याने स्वामी यांच्या मागणीनुसार, त्यांना स्ट्रॉ दिल्याची माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली. दरम्यान, स्वामी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने एनआयएला दिले.
स्वामी (८३) यांना एनआयएने त्यांच्या रांची येथील राहत्या घरातून ८ ऑक्टोबर रोजी अटक केली. अटक केल्यानंतर त्यांच्यावर व अन्य काही आरोपींवर तातडीने दोषारोपपत्रही दाखल केले.