संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर द्या; विशेष न्यायालयाचे ईडीला निर्देश
By दीप्ती देशमुख | Published: September 8, 2022 01:52 PM2022-09-08T13:52:32+5:302022-09-08T13:53:25+5:30
संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.
मुंबई :
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीला गुरुवारी दिले. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.
मनी लॉड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयाने दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली. त्यानंतर राऊत यांनी लगेचच जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. गुरुवारी या जामीन अर्जावरील सुनावणीत न्यायालयाने ईडीला राऊत यांच्या अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.
काय आहे प्रकरण?
ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, म्हाडाचा भूखंड असलेली पत्राचाळ विकसित करण्याचे काम प्रवीण संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र, प्रवीण राऊत यांनी पत्राचाळीतील रहिवाशांची फसवणूक करून काही भूखंड खासगी विकासकाला विकला.
म्हाडा व भाडेकरूंच्या तोंडाला पाने पुसत प्रवीण राऊत यांनी भूखंडाचे अनेक भाग खासगी विकासकांना हस्तांतरित केले. तर स्वतःचे २५ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. ईडीच्या म्हणण्यानुसार, या व्यवहारातील काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा झाली आहे.