Join us

धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:07 AM

उच्च न्यायालयात याचिकाधनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवाउच्च न्यायालयात याचिकालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सामाजिक न्यायमंत्री ...

उच्च न्यायालयात याचिका

धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा

उच्च न्यायालयात याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रक्रियेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका पुण्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांना आणखी दोन मुले असल्याचे नमूद न करून फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पाटील यांनी याचिकेत केली आहे.

सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जाबरोबर जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंडे यांनी त्यांना दोन मुली असल्याचे नमूद केले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मुंडे यांनी समाजमाध्यमाद्वारे स्पष्ट केले की, त्यांच्या पत्नीव्यतिरिक्त आणखी एका महिलेशी २००३ पासून त्यांचे संबंध आहेत. त्या महिलेपासून त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा व मुलगी आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

मुंडे यांनी हेतुपूर्वक ही बाब लपवली. आयपीसी ४२० अंतर्गत त्यांनी गुन्हा केला आहे. ही बाब उघडकीस आल्यावर मी परळी (बीड जिल्हा) येथील संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. पोलीस महासंचालक व मुख्य निवडणूक आयुक्तांनीही मी नोंदविलेल्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे ही याचिका दाखल केली आहे, असे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे.

निवडणूक अर्जात खोटी माहिती दिल्याबद्दल मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्या. तसेच मी केलेल्या तक्रारीवरून चौकशी व तपास करण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवर न्यायालयात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.