Join us

महिन्याच्या आत धनगर अहवाल द्या, अन्यथा....; क्रांतीशौर्य सेना धनगरांच्या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 11:05 PM

सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात क्रांती शौर्य सेनेच्या संस्थापिका कल्याणी वाघमोडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ध

- श्रीकांत जाधव

मुंबई : आगामी लोकसभा,विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये धनगर समाज मतांमधून आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी महाराष्ट्रात जागर दवंडीच्या माध्यमातून धनगर आरक्षण आंदोलन करण्यात येत आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने केंद्राला अहवाल पाठवावा, अन्यथा ३० ऑक्टोबर रोजी आझाद मैदानातं धरणे- आंदोलन करण्यात येईल असा इशारा क्रांतीशौर्य सेनेने दिला आहे.

सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात क्रांती शौर्य सेनेच्या संस्थापिका कल्याणी वाघमोडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अंमलबजावणीची मागणी अनेक वर्षापासूनची आहे. मात्र ७५ वर्षात ती पूर्ण झाली नाही. आजपर्यंत कोणत्याच सरकारला धनगर आरक्षणाचे भिजते घोंगडे सोडवलेले नाही. धनगर समाजाला दिलेली आश्वासने हवेतच विरघळून गेली. त्यामुळे धनगर जमातीचा रोष वाढत चाललेला आहे.

त्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने केंद्र सरकारला धनगराचा अहवाल पाठवावा, अन्यथा ३० ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येईल. ७ ते ११ डिसेंबर २०२३ या दरम्यान दिल्ली येथे जंतर मंतर मैदानात निषेधार्ह धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा क्रांती शौर्य सेनेने अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी दिला.

राज्यघटनेप्रमाणे धनगराना एस.टी.चे प्रमाणपत्र, ओबीसी जातनिहाय जनगणना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी, मेंढपाळांसाठी संरक्षण व मेंढ्यांसाठी राखीव चराई क्षेत्र व विमा उपलब्ध करणे, आरक्षण आंदोलनातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे माघार घेणे, आदी सर्व मागण्या क्रांतीशौर्य सेनेने केल्या आहेत. 

टॅग्स :धनगर आरक्षण