मुंबई : पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबणे, वाहतूककोंडीची समस्या यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता अधिक असते. याची ‘माय बेस्ट’ ॲपवर तक्रार दाखल करा, तक्रारींचे वेळीच निवारण करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येतील, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. वीजग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रम सज्ज झाला असून, नियंत्रण कक्ष ‘२४ बाय ७’ कार्यरत असणार आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहकांनी त्यांचा वीजग्राहक क्रमांक अथवा वीज मापक क्रमांक नोंदवावा. फ्युज कंट्रोल दूरध्वनी क्रमांक वीज देयकावर छापलेले आहेत.
वीजग्राहक क्रमांक (उदाहरणार्थ १००-०२६-०८९०० असा) विद्युत देयकाच्या अगदी वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात छापलेला आहे. वीज मापक क्रमांक हा विद्युत देयकाच्या मागील बाजूस, मध्यभागी असलेल्या टेबलच्या पहिल्या रकान्यात दर्शविण्यात येतो. या दोनपैकी एक क्रमांक तक्रार नोंदविताना आपल्याजवळ असणे अपेक्षित आहे. तक्रारी ‘MiBest’ या ॲपवर नोंदवू शकतात. या ॲपवर वीजग्राहक त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांकावर गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात. दाखल केलेल्या तक्रारीनंतर नियुक्त करण्यात आलेले कमर्चारी तत्काळ दाखल होणार आहेत.
इलेक्ट्रिक मीटर बॉक्स उंचीवर लावा-
पावसाच्या पाण्यापासून वीजमापक व संच मांडणींचा बचावासाठी वीजमापक केबिन सिमेंटने बांधून घ्या. केबिन जमिनीपासून उंचावर बांधा, जेणेकरून त्यात पावसाचे पाणी शिरणार नाही. केबिन लाकडी असल्यास ती योग्य प्रकारे सुरक्षित करा.
हे करू नका-
केबिनमध्ये पाणी गळत असल्यास हातमोजे, इन्सुलेटेड प्लॅटफार्मचा वापर केल्याशिवाय संच मांडणीस उपकरणे रबरी हातमोजे घातल्याशिवाय स्पर्श करू नका. कोणत्याही परिस्थितीत विजेची ठिणगी पडत असेल, पाणी ठिबकत असेल, तर मार्गप्रकाश स्तंभांना, रस्त्यावरील लाल रंगाच्या डिस्ट्रिब्युशन पिलर्स व केबिनमधील वीजमापकांना स्पर्श करू नका.
...तर मुख्य स्विच बंद करण्याचे आवाहन
अतिवृष्टीच्या वेळी किंवा वीजमापक केबिनमध्ये पाणी गळू लागल्यास किंवा पाणी शिरले असता, आपल्या घरातील विजेचे मुख्य स्वीच बंद करा. विद्युत संच मांडणीतील त्रुटी पूर्णपणे दूर झाल्यानंतर तसेच परवानाधारक विद्युत कंत्राटदाराने अथवा बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्याने सुरक्षिततेची खात्री दिल्यानंतरच वीजपुरवठा सुरू करा.
परवानाधारकांकडून वीज जोडणी घ्या!
परवानाधारक विद्युत ठेकेदारांकडून वीजमापकांच्या केबिनपासून घरापर्यंतचे वायरिंग तसेच घरातील विद्युत उपकरणांचे वायरिंग व विद्युत संचमांडणी तपासून घ्या. संच मांडणीमध्ये योग्य रेटिंगच्या ईएलसीबीचा वापर करा.