Join us

मॅट्रिमोनिअल साइटवर फसवणूक झाल्यास तक्रार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 1:42 AM

मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या मॅट्रिमोनिअल साइटवरून होणाऱ्या सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृतीपर ऑनलाइन वेबिनार कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री ठाकूर यांच्या हस्ते झाले.

मुंबई : विवाहासाठी मॅट्रिमोनिअल साइट्सवर नोंदणी करताना, तसेच सोशल मीडियावर व्यक्तिगत माहिती टाकताना महिलांनी सावधगिरी बाळगावी, तसेच मॅट्रिमोनियल साइटवरील  विवाह प्रस्ताव अतिशय पारखून घ्यावेत, फसवणुकीचे प्रकार लक्षात येताच गप्प न राहता पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या मॅट्रिमोनिअल साइटवरून होणाऱ्या सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृतीपर ऑनलाइन वेबिनार कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर आदी उपस्थित होते. यावेळी ठाकूर म्हणाल्या की, सर्वच क्षेत्रांतील तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत आहे. तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. इंटरनेटचा वापर वेगाने वाढत असतानाच, सायबर गुन्हे करण्याच्या प्रमाणातही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून आपण मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, तसेच विविध माध्यमांतून ओळखी झालेल्या लोकांच्या संपर्कात राहत असतो.  काही वेळेस फक्त एखादी व्यक्ती आपल्या सोशल मीडियावरील फ्रेंडलिस्टमध्ये आहे किंवा चांगल्या स्वभावाची वाटत आहे, म्हणून कोणतीही सावधगिरी न बाळगता त्या व्यक्तीच्याही संपर्कात येतो. बहुदा अशा प्रकारे महिलांसंदर्भात घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांची सुरुवात होत असते. त्यामुळे तंत्रज्ञान शिकत असताना, त्याचा वापर करताना आपल्या खासगी, व्यक्तिगत जीवनाविषयी कोणत्या व्यक्तीला किती माहिती द्यावी,  सतर्क राहून सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वत:ला कसे वाचवावे, याबाबत महिलांनी अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.यावेळी वेबिनारच्या माध्यमातून सहभागी महिला, पालकांना विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी करताना, तसेच त्यानंतर घ्यायची काळजी या अनुषंगाने सायबर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या चर्चेत विविध मॅट्रिमोनिअल संकेतस्थळांच्या प्रतिनिधींनीही सहभाग घेतला.सायबर गुन्हे करण्याच्या प्रमाणातही दिवसेंदिवस वाढसर्वच क्षेत्रांतील तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत आहे. तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. इंटरनेटचा वापर वेगाने वाढत असतानाच, सायबर गुन्हे करण्याच्या प्रमाणातही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून आपण मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, तसेच विविध माध्यमांतून ओळखी झालेल्या लोकांच्या संपर्कात राहत असतो. 

टॅग्स :धोकेबाजी