वैद्यकीय कचरा जमा होण्यात मुंबई अव्वल, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:56 AM2018-04-01T00:56:47+5:302018-04-01T00:59:25+5:30
मुंबईमधील छोट्या दवाखान्यांपासून मोठमोठ्या रुग्णालयांपर्यंत दररोज १७ हजार किलोग्रॅम वैद्यकीय कचरा जमा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मुंबईपाठोपाठ पुण्याचा क्रमांक लागत असून पुण्यात दरदिवशी ११ हजार किलोग्रॅम, नाशिकमध्ये ८ हजार किलोग्रॅम, नागपूर ७ हजार ५०० किलोग्रॅम, औरंगाबादमधून ५ हजार किलोग्रॅम वैद्यकीय कचरा जमा करण्यात येत आहे.
- कुलदीप घायवट
मुंबई : मुंबईमधील छोट्या दवाखान्यांपासून मोठमोठ्या रुग्णालयांपर्यंत दररोज १७ हजार किलोग्रॅम वैद्यकीय कचरा जमा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मुंबईपाठोपाठ पुण्याचा क्रमांक लागत असून पुण्यात दरदिवशी ११ हजार किलोग्रॅम, नाशिकमध्ये ८ हजार किलोग्रॅम, नागपूर ७ हजार ५०० किलोग्रॅम, औरंगाबादमधून ५ हजार किलोग्रॅम वैद्यकीय कचरा जमा करण्यात येत आहे. तर राज्यात दरदिवशी ७१ हजार किलोग्रॅम वैद्यकीय कचरा जमा केला जात आहे.
महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या अहवालातून ही बाब समोर आली असून, २०१५ ते २०१६ दरम्यान वैद्यकीय कचऱ्यात १४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंबईमधील मोठी रुग्णालये आणि छोटे दवाखाने, रक्तपेढी, अॅक्युपंक्चर यांतून दररोज १७ हजार किलोगॅ्रम वैद्यकीय कचरा जमा करण्यात येतो. यामध्ये बेड असलेले रुग्णालय आणि नॉन बेड रुग्णालय अशी वर्गवारी केली जाते. मुंबईमध्ये बेड असलेल्या रुग्णालयांची संख्या १ हजार ५४२ असून नॉन बेड रुग्णालयांची संख्या ९ हजार ४०० आहे. यामध्ये रक्तपेढी, अॅक्युपंक्चर यांचा समावेश आहे. बेड असलेल्या रुग्णालयांमधून दररोज १३ हजार २०० किलोग्रॅम वैद्यकीय कचरा गोळा केला जातो. तर नॉन बेड रुग्णालयांमधून दररोज ३ हजार ८०० किलोग्रॅम वैद्यकीय कचरा गोळा केला जातो. वैद्यकीय कचºयामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णालयांतील कर्मचारी वर्ग यांना कचºयाबाबत योग्य माहिती देऊन वैद्यकीय कचरा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात यावा, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ. ए.आर. सुपाते यांचे म्हणणे आहे.
रुग्णालयातील कचºयाचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. धोकादायक वैद्यकीय कचरा जाळण्यात येतो. प्लॅस्टिक कचºयाचा भुगा करून पुनर्वापर करण्यात येतो. सुई, इंजेक्शन इ. वस्तू १ हजार २०० अंश सेल्सिअस तापमानावर तापवून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येते, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कनिष्ठ सहायक वैज्ञानिक चेतन सावंत यांनी दिली.
वैद्यकीय कचरा म्हणजे काय?
वैद्यकीय कचरा म्हणजे संसर्गजन्य साहित्य किंवा संसर्गजन्य पदार्थ असलेला कोणताही कचरा. यामध्ये आरोग्यविषयक सुविधा पोहोचविणारी चिकित्सक कार्यालये, रुग्णालये, दंत रुग्णालये, प्रगोगशाळा, वैद्यकीय संशोधन सुविधा, पशुवैद्यकीय दवाखाने यांमधून तयार होणाºया कचºयाला वैद्यकीय कचरा म्हणतात. वैद्यकीय कचºयात सुई, इंजेक्शन, सलाइन बाटल्या, वापरलेले ग्लोज, औषधांच्या बाटल्या, प्रयोगशाळेतील बाटल्या, रसायन, रेझर, धागे यांचा समावेश आहे.