Join us

वरवरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह एनआयएला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:25 AM

राव यांची प्रकृती खालावली असून ते मृत्युशय्येवर आहेत, असे राव यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

मुंबई : शहरी नक्षलवाद व एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ कवी वरवरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व एनआयएला दिले. तसेच त्यांचे कुटुंबीय अंतर राखून त्यांना भेटू शकतात का, अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली.

राव यांची प्रकृती खालावली असून ते मृत्युशय्येवर आहेत, असे राव यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. ८१ वर्षांचे राव यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले असून अन्य आजार असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. राव यांच्या प्रकृतीची माहिती देण्याचे निर्देश देत न्यायालयाने त्यांचे कुटुंबीय त्यांना दुरून भेटू शकतात का, अशी विचारणा राज्य सरकार व एनआयएकडे केली. तसेच २२ जुलैपर्यंत याचे उत्तर देण्याचे निर्देश दिले.

‘जे.जे. रुग्णालयात असताना राव यांनी खाटेला डोके आपटले. त्यांना गंभीर दुखापत झाली. कोरोनाव्यतिरिक्त त्यांना अनेक आजार आहेत. त्यांचे हे शेवटचे दिवस आहेत. त्यांना मृत्यू येणार असेल तर त्यांच्या कुटुंबासमोर येऊ दे’, असे राव यांच्या वकिलांनी म्हटले. तसेच त्यांची जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयाला केली. ते तपासामध्ये व्यत्यय आणण्याच्या स्थितीत नाहीत, हे एनआयएला माहीत आहे, असेही राव यांच्या वकिलांनी म्हटले. त्यावर न्यायालयाने राव यांच्या वकिलांना प्रतिप्रश्न केला की, राव यांची प्रकृती इतकी गंभीर आहे तर त्यांना रुग्णालयातून अन्य ठिकाणी हलविणे योग्य आहे का? त्यांना कोरोना आहे तर ते त्यांच्या कुटुंबाला कसे भेटणार?त्यावर प्रशासनाने परवानगी दिली तर राव यांचे कुटुंब सर्व खबरदारी घेऊन अंतर राखून त्यांना भेटतील, असे राव यांच्या वकिलांनी सांगितले.

कोरोनाच्या रुग्णांना भेटू दिले जात नाही, अशी माहिती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला दिली, तर सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी राव यांच्या कुटुंबीयांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राव यांची भेट घडवून देऊ, असे न्यायालयाला सांगितले. राव यांच्यावर मुंबईतल्या खूप चांगल्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, असे ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने कुटुंब अंतर राखून राव यांना भेटू शकते का, अशी विचारणा सरकार आणि एनआयएकडे केली.

गोन्साल्वीस, तेलतुंबडे यांचीही न्यायालयात धाव 

कारागृहात वरवरा राव यांच्या सहवासात आल्याने आपलीही कोविडची चाचणी करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज वेर्नोन गोन्साल्वीस व आनंद तेलतुंबडे यांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

टॅग्स :न्यायालयमुंबई