कचरा जाळणाऱ्यांची करा तक्रार, कारवाई नक्की होणार; महापालिकेचे मुंबईकरांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 06:54 AM2023-11-12T06:54:44+5:302023-11-12T06:54:52+5:30
हेल्पलाइन क्रमांक जारी
मुंबई : प्रदूषणाच्या विळख्यातून मुंबईची सुटका करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वाढते वायूप्रदूषण आणि धूळ नियंत्रणासाठी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ प्रशासकीय विभागांमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही कचरा जाळत असल्यास त्याच्याविरुद्ध ‘मुख्यमंत्री
स्वच्छ मुंबई हेल्पलाइन ८१६९६-८१६९७ वर छायाचित्रासोबत तक्रार नोंदवा, असे आवाहन महापालिकेनेे केले आहे.
आरोग्यावर घातक परिणाम
शहरात व काही उपनगरांमध्ये विल्हेवाट लावण्यासाठी अनेकदा कचरा जाळला जातो. त्यामुळे विषारी धूर वातावरणात पसरत आहेत. परिणामी कर्करोग, यकृताचे आजार, मलावरोध, अस्थमा, श्वसनावरोध, मेंदूविकार होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती तज्ज्ञ देतात. महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन पालिकेने प्रदूषणाच्या नव्या नियमावलीमध्ये कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने २६ ऑक्टोबर रोजी वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यातील अनुक्रमांक ९ मधील अनुपालन करण्याच्या उद्देशाने पालिकेने व्हॉट्सॲप सेवा क्रमांकावर तक्रार नोंदविण्यासाठी टॅबमध्ये ‘कचरा जाळणे’ हा पर्याय अद्ययावत केला आहे. उघड्यावर कचरा जाळणे, हा पर्यावरणविषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हा आहे.
त्यासाठी कायद्यात कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, नागरिक अनेकदा उघड्यावर कचरा जाळून विल्हेवाट लावतात आणि पर्यायाने कायद्याचे उल्लंघन करतात. प्रदूषणात भर पाडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
मुंबई महानगर व परिसरात वायू प्रदूषण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. कचरा जाळताना कोणी आढळल्यास त्याची तक्रार ताबडतोब करा.
- चंदा जाधव, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग