जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शंभर कोटींच्या वसुली आरोप प्रकरणाचा तपास सीबीआयसाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच प्राथमिक चौकशी अहवाल फोडणाऱ्यांच्या मुळापर्यंत जाऊन छडा लावणे त्याच्यासाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. फुटलेल्या अहवालाचा निष्कर्ष वगळता अन्य बहुतांश बाबीत तथ्य असल्याने या प्रकरणातील ‘घरभेदी’ जाणणे तपास यंत्रणेसाठी आव्हानात्मक बनले आहे.
सीबीआयचे संचालक सुबोध जायसवाल यांनी याप्रकरणी कसून चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सीबीआयने अहवाल फुटी प्रकरणात पहिला आरोपी स्वतःच्या यंत्रणेतील पीएसआय अभिषेक तिवारीला अटक केल्याचे सांगण्यात आले.
परमबीर सिह यांनी केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट देणारा अहवाल शनिवारी प्रसारमाध्यमांकडे पोहचविण्यात आला. फुटलेल्या अहवालाबाबत तो बनावट असल्याचे सीबीआयने स्पष्टपणे जाहीर करण्याऐवजी या प्रकरणाचा तपास सुरू आहे, कोणलाही क्लीनचिट देण्यात आलेली नाही इतकेच स्पष्ट केले तेव्हा यामागे ‘घरभेदी’ असल्याचे उमगले होते. ६ दिवसात संबंधितांचे संभाषण पडताळून ‘पीई’ फोडण्याच्या प्रकरणात पीएसआय तिवारी असल्याचे शोधून काढण्यात आले. ॲड. आनंद डागा यांच्यासमवेत त्याने हा कट रचल्याने त्यालाही अटक करण्यात आली.
मोठी आर्थिक देवाणघेवाण
देशमुख यांच्या ‘पीई’चा गुप्त अहवाल फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करण्यात आल्याचे समजते. पीएसआय तिवारीला त्यात मोठा वाटा मिळाला असून अन्य काही वरिष्ठ अधिकारी या कारस्थानामध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. त्याचा नेमका तपशील शोधण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.