टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ‘रिपब्लिक’च्या सीईओला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:24 AM2020-12-14T04:24:01+5:302020-12-14T04:24:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना रविवारी अटक करण्यात आली. या प्रकरणातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना रविवारी अटक करण्यात आली. या प्रकरणातील ही १३ वी अटक आहे.
टीआरपी मोजण्यात ‘भारत ऑडियन्स ब्रॉडकास्ट रिसर्च सेंटर’ या संस्थेला (बीएआरसी) मदत करणाऱ्या हंसा रिसर्च ग्रुपचा माजी कर्मचारी विशाल भंडारी याला अटक करून गुन्हे शाखेने हा घोटाळा उघडकीस आणला होता. यापूर्वी टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिकच्या वितरण विभागाच्या घनश्याम दिलीपकुमार सिंग यांना १२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.
घनश्याम हा अटकेत असलेल्या क्रिस्टल ब्रॉडकास्ट प्रायव्हेट लिमिटेडचा भागीदार आशिष अभिदुर चौधरीच्या संपर्कात आला. त्याने टीआरपीचे काम आशिषला सांगितले. मात्र आशिषला पैसे कमी वाटल्याने त्याने कामास नकार दिला. अभिषेक कोलवडेही त्या दाेघांसाेबत हाेता. त्याने हे काम घेतले.
घनश्याम हा रिपब्लिकच्या टीआरपीसाठी अभिषेकला जानेवारी ते जुलैदरम्यान महिन्याला १५ लाख रुपये देत होता. अभिषेकच्या चौकशीतून ही बाब समोर येताच घनश्यामला ठाणे येथून अटक करण्यात आली. त्याने काही पैसे आशिषच्या कार्यालयामार्फत दिले हाेते. तर काही पैसे हवालामार्फत दिल्याचेही त्याच्या चौकशीतून समोर आले.
चौधरीच्या क्रिस्टल ब्रॉडकास्टमार्फत न्यूज नेशन टीव्ही, वॉव म्युझिक आणि रिपब्लिक भारत या हिंदी वाहिन्यांची टीआरपी वाढविण्याकरिता २०१७ ते जुलै २०२० या कालावधीत अभिषेकला पैसे देण्यात आले हाेते. त्यांच्याच चौकशीतून विकास खानचंदानीचा सहभाग समोर येताच, त्यांना अटक करण्यात आली. विकास यांच्याकडे यापूर्वीदेखील चौकशी करण्यात आली होती.
..........................................