मुंबई - टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिषेक कोलवडेच्या चौकशीत, रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी वाहिनीच्या मालक, चालकासह संबंधितांनी पैसे पुरविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्यांना पाहिजे आरोपी म्हणून घोषित करत, त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.टीआरपी घोटाळ्यात रविवारी अभिषेक कोलवडे उर्फ अजित उर्फ अमित उर्फ महाडिक याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात करण्यात आलेली दहावी अटक आहे. सोमवारी अभिषेकसह रामजी दूधनाथ वर्मा (४१), दिनेशकुमार विश्वकर्मा (३७) आणि हरीश पाटील यांना न्यायालयात हजर करण्यात आले. अभिषेकसह अन्य साथीदारांनी महामुव्ही, न्यूज नेशन आणि रिपब्लिक चॅनेल्स जास्त वेळ पाहण्यासाठी संबंधितांच्या मालक, चालक तसेच त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून पैसे स्वीकारून ते बॅरोमीटर असलेल्या घरातील लोकांना दिल्याचे उघडकीस आले. याबाबतची माहिती गुन्हे शाखेने सोमवारी न्यायालयात दिली. त्यामुळे आता महामुव्ही, न्यूज नेशन आणि रिपब्लिक चॅनेल्सच्या मालक, चालकासह अन्य पदाधिकाऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. अटक आरोपी आणि पाहिजे आरोपी यांच्यातील आर्थिक गैरव्यवहाराबाबतचे पुरावेही सापडले असून त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उमेश मिश्राला जामीनरिपब्लिक चॅनेल्स पाहण्यासाठी पैसे पुरविणारा हंसाचा माजी कर्मचारी उमेश मिश्रा याला सोमवारी जामीन मंजूर झाला. या प्रकरणातील ही मोठी अटक होती.
‘त्या’ आराेपींना २८ ऑक्टाेबरपर्यंत काेठडी रिपब्लिकच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी चॅनेलची लोकप्रियता वाढल्याचे भासवण्यासाठी अनेक गैरप्रकार केल्याच्या तक्रारीही गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या असून त्याबाबत सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या हरीश याचे अभिषेकच्या मॅक्स मीडिया कंपनीच्या बँक खात्यात संशयास्पद देवाणघेवाण झाल्याचेही समोर आले आहे. तसेच दोघांमध्ये घनिष्ट संबंध असून, याबाबतही अधिक तपास सुरू आहे. अटक आरोपी आणि पाहिजे आरोपी खोटे साक्षीदार तयार करून यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही या वेळी न्यायालयात सांगण्यात आले. दरम्यान, अभिषेकसह वर्मा, विश्वकर्मा, पाटील या आराेपींना २८ ऑक्टाेबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे.