मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या भाषणामुळे महाराष्ट्रासह देशभरात या मुद्द्याला पुन्हा वाचा फुटली. गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेशात राज ठाकरेंच्या भाषणानंतर मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी विविध हिंदू संघटना पुढे आल्या आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंची ही भोंगाविरोधी भूमिका संविधानाविरोधात असल्याचं मत व्यक्त केलं आहे. भोंगे काढण्याचा विषय राज ठाकरेंनी करु नये. भोंगे काढण्याची सोंगं राज ठाकरेंनी करु नये. दादागिरी फक्त तु्म्हाला करता येते असं अजिबात नाही. दादगिरीला दादागिरीने सुद्धा उत्तर दिलं जाऊ शकतं, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करू नये. हवे असल्यास ते मंदिरात भोंगे लावू शकतात पण मशिदींमधून ते हटवण्याची मागणी करू नये, असे आठवले म्हणाले. आपल्या देशात लोकशाही आहे. भारतातील मुस्लीम पूर्वी हिंदू होते. त्यामुळे एक दुसऱ्यांच्या धर्मचा आदर करावा. प्रत्येक पक्षाची मुस्लीम विंग आहे, त्यामुळे भोंगे काढायला लावणे योग्य नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
मंदिरांवर ज्यांना भोंगे लावायचे आहेत त्यांनी लावावेत. नवरात्र उत्सव, गणपती उत्सव असतो, भीम जयंती, शिवजयंती असते तेव्हा मोठे डीजे असतात. त्याचा मुस्लिमांना त्रास होतो. मात्र त्यांची याबद्दल काही अजिबात तक्रार नाही. त्यामुळे अजानसंदर्भात भोंगे काढण्याची ही भूमिका आहे ती संविधानाच्याविरोधात आहे. ही भूमिका आहे ती समाजात, धर्माधर्मात वाद निर्माण करणारी आहे. राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
सुव्यवस्था बिघडविण्याचा कुणी प्रयत्न केला तर...
राज ठाकरे यांनी मशिदींतील भोंगे हटवण्याची मागणी लावून धरली आहे. ठाकरे सरकारला अल्टिमेटमही देण्यात आले आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा कुणी प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण तयारीत असल्याचे म्हटले असून, कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेत आहोत. कुठल्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी कृती कुणी करू नये. अशी कृती कुणी केल्यास मग ती संघटना असो वा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई होईलच, असा इशारा वळसे पाटील यांनी दिला आहे.