मुंबई- शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. याचदरम्यान एक महत्वाची घडामोड समोर आली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी रामदास आठवले यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षालाही वाटा देण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे केली. याबाबत स्वत: ट्विट करत रामदास आठवले यांनी माहिती दिली.
रामदास आठवले ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मंत्री म्हणून संधी देताना इतर निकषांबरोबरच परफॉर्मन्स फॉर्म्युला वापरण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत झाल्याचे समजते. जातीय, विभागीय संतुलन साधताना केवळ हे दोनच निकष न वापरता मंत्री म्हणून काम करण्याचा आवाका किती हे तपासून संधी दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलैच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर होईल, असं सांगण्यात येत आहे.