Join us

मुंबई शहरात रिपरिप; पूर्व-पश्चिम उपनगरात जोर‘धार’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 6:06 AM

राज्यभरात जोर पकडलेल्या पावसाने शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात जोर‘धार’ वर्षाव केला. येथे पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच, मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली.

मुंबई - राज्यभरात जोर पकडलेल्या पावसाने शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात जोर‘धार’ वर्षाव केला. येथे पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच, मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. उपनगराच्या तुलनेत मुंबई शहरात मात्र पावसाचा जोर कमी होता. मुंबईच्या उपनगरात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असतानाच, मुंबई शहरात होत असलेल्या पावसाच्या रिपरिपीने मुंबईकर कंटाळले होते. येत्या २४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.मुंबईकरांची शनिवारची पहाटच पावसाने उजाडली. मुंबई शहरासह उपनगरात सकाळपासून जोर धरलेल्या पावसाने आपला मारा दुपारी दोन वाजेपर्यंत कायम ठेवला. विशेषत: मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात सकाळपासून पाऊस वेगाने कोसळत होता. सकाळी ११ वाजता दाटून आलेल्या ढगांमुळे मुंबईत ऐन सकाळीच सायंकाळ झाल्याचे चित्र होते. पूर्व आणि पश्चिम उपनगरात घाटकोपर, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, कांदिवली, बोरीवली, दिंडोशी, चेंबूर, मरोळ, वांद्रे, वर्सोवा परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबई शहरातील दादर, वडाळा, धारावी आणि वांद्रे येथील परिसरात सकाळसह दुपारी वेगवान पावसाने हजेरी लावली. सायन परिसरापुढे म्हणजे माटुंगा, लालबाग, वरळी, महालक्ष्मी, गिरगाव, भायखळा, नरिमन पॉइंट आणि मरिन ड्राइव्ह परिसरात उपनगराच्या तुलनेत पावसाचा जोर फारसा नव्हता.सकाळपासून दुपारपर्यंत कोसळलेल्या पावसाचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला. रस्ते वाहतुकीवरही पावसाचा विपरित परिणाम झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, कुर्ला-अंधेरी मार्ग, घाटकोपर असल्फा रोड अशा प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक धिम्या मार्गाने धावत होती, तर याच रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे चित्र होते. दरम्यान, दुपारी ३नंतर पावसाने विश्रांती घेतली आणि मुंबईकरांनी सुटकेचा श्वास सोडला.येत्या २४ तासांत उत्तर कोकणात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. उत्तर कोकणात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे.शनिवारी शहरात १, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ४ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. तर शहरात २, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात २, पूर्व उपनगरात ५ आणि पश्चिम उपनगरात ८ अशा एकूण १५ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या.

टॅग्स :मुंबईपाऊस